-श्रीराम ग. पचिंद्रे, ग. पचिंद्रे------------------
पु. ल. देशपांडे यांनी "तुम्हाला कोण व्हायचंय? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' या लेखात, नागपूरकर होणाऱ्यांना उद्देशून म्हटलंय, ""नागपुराखेरीज इतर कुठेच खाण्यापिण्याचा षौकच नसतो असा सिद्धान्त उराशी बाळगावा; मात्र पदार्थांचा फार तपशील देऊ नका, नाहीतर एखादा गोवेकर नुसत्या बांगड्याचे वीस प्रकार सांगेल आणि तुम्हांला तुमच्या वडाभाताच्या पुढे जाता येणार नाही, म्हणजे पंचाईत सगळी...''खरी गोष्ट. गोव्याचा "मनीस' माशावर जिवापाड प्रेम करतो. गोंयकार हा सुशेगाद! निवांत!! आनंदानं जगायची आवड असलेला. अथांग सागराच्या किनाऱ्याला विसावलेला हा गोमंतक जात्याच रसिक आहे. मद्य आणि मत्स्य यांचा रसिकतेनं आस्वाद घेणारा आहे. आज गोव्यात सगळं मिळतं. कोंबडी, बोकड, पोर्क इत्यादी...प्रांताचा उल्लेख करायचा तर पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य, मालवणी, कोल्हापुरी आणि देशाच्या सरहद्दी ओलांडून चिनी, पोर्तुगाल, इटालियन इत्यादी असं सारं काही...पण जातीवंत गोमंतकीयाच्या मनात खास गोमंतकीय पाककृतीतून बनवलेल्या माशाला जे अढळ स्थान आहे, ते क्वचित दुसऱ्या कशाला असेल. पु. लं.च्या विधानात बांगडा आला म्हणून बांगड्यापासून आरंभ करूया. अगदी जाता जाता सांगायचं झालं तर हे घ्या, सोलांतले बांगडे, बांगड्याचं सुक्कं, बांगडा हुड्डामेथी, कांदा-बांगड्याचं हुमण, कांद्याशिवायचे बांगडा हुमण, भरला बांगडा, मसाला बांगडा, तार्ले- बांगड्याचं धबधबीत, रवा लावलेला बांगडा, तार्ले-बांगड्याचं सुकं, निखाऱ्यांवरचा बांगडा, बांगड्याचं लोणचं, भाजल्या बांगड्याचं सुक्कं...काय सुटलं का नाही तोंडाला पाणी?शीत-कढी ही पोट भरण्यापुरती असावी ही गोमंतकीयांची अपेक्षा असते. शीत म्हणजे भात आणि कढी म्हणजे माशाचं हुमण, अर्थात रस्सा. ही किमान गरज. पण खऱ्या अर्थानं रसना तृप्त होण्यासाठी गोमंतकीय पाककलेचा विकास झालेला आहे. आमसुलं आणि खोबरं यांचा चांगला वापर गोमंतकीय पाककलेत विशेषतः करतात.गोव्यात आता सुरमई(इसवण), पापलेट, सरंगा, चनक (चोनाक), तांबुसा, मुडदुशा, काळुंद्रा, सुंगट(कोळंबी) असे महागडे मत्स्यप्रकार विकत घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. पण गोव्याच्या माणसांना मासा लागतोच. बहुसंख्य लोकांना दररोज लागतो. मग त्यातल्या त्यात बांगडा परवडतो. बांगडा तुलनेनं स्वस्त, चविष्ट आणि नीट खाता येणाऱ्यासाठी भन्नाटच. अर्थात गोवेकरांना तो खाता येतोच. सोलांतले बांगडे हा आंबट-तिखट चवीचा रसदार प्रकार आहे. सोलं म्हणजे आमसुलं. बांगड्याच्या आकारानुसार दोन किंवा तीन तुकडे करतात. आधी हळदमीठ लावून नंतर मिरच्या, लसूण, जिरे, आल्याचं वाटलेलं मिश्रण लावायचं, बांगड्याचे आणखी तुकडे केले जातात, मोठ्या पातेल्यात तळाशी तेल ओतून त्यावर तुकड्यांचा एक थर लावतात, मग त्यावर आमसुलांचा किंवा ताज्या कोकमच्या सालींचा थार लावतात, त्यावर तुकड्यांचा आणखी एक थर असे थर लावतात. हे पातेलं मंद आचेवर ठेवून झाकणाच्या वर निखारे ठेवतात. 15 मिनिटाच्या आत सोलातले बांगडे तयार!सुक्कं करताना छोटे अखंड बांगडे घेतात. चेचलेलं तिरफळ, आलं, लसूण, मिरच्या, खोबरं, चिंचेचं वाटण करून पातेल्यात बांगडे टाकतात, हळद-मीठ तर असतंच. गरजेपुरतं पाणी आणि सोलं टाकतात. मंद आचेवर पाणी आटेपर्यंत शिजवलं, की झालं सुक्कं तयार. तारली, वेरल्या, पापलेट यांचंही सुक्कं असंच करतात, पण बांगड्याचा स्वाद म्हणजे अगदी अहाहा...भरला बांगडा हा प्रकार तसा अलीकडच्या काळातला. अखंड बांगडा मधोमध चिरून, पण दोन तुकडे न करता मधला सरळ काटा काढून (किंवा न काढतासुद्धा केला तरी चालेल) मधे मसाला भरून बाहेरून रवा लावून तव्यावर जरा जरा तेल टाकत दोन्ही बाजूंनी एकसारखा परतून करतात. जिरे, कोथिंबीर, चमचाभर हळद, ओल्या मिरच्या, तेवढीच मिरपूड, लवंगा, दालचिनी, लसूण, थोडी चिंच,ओलं खोबरं, आलं, मीठ हे सगळं साहित्य जास्त पाणी न घालता वाटून घेतात.मग कांदा बारीक चिरून त्यात घालतात; ह्या मसाल्याच्या गोळ्या करून बांगड्याच्या पोटात घालून नीट दाबून मसाला सारखा करून घेतात. वरनं मीठ लावून पंधरा मिनिटांनी मिरची, हळद, चिंचेचा कोळ लावून रव्यात घोळवून तव्यात तेलावर भाजलं, की भरला बांगडा तयार.बांगड्याचे हे प्रकार शहरी आणि निमशहरी भागात बनवले जातात. हा भरला बांगडा आख्खा असतो. तसा तो खाण्याची खुमारी काही औरच. पण तो भाकरी- चपातीला न लावता नुसता खावा, तरच त्याची खरी गंमत. नंतर मग भाताबरोबर बांगड्याचं हुमण मजा आणतं.बांगड्याचं हुमण हा गोव्यातला जुना, तसेच खेडोपाड्यात केला जाणारा प्रकार. त्याची चमचमीत चव काही आगळीच.बांगड्याच्या तुकड्यांना मीठ लावून अर्धा तास ठेवून मग खोबरं, हळद, चिंचेचा कोळ, तिरफळं, आमसुलं, लाल मिरच्या जरा पाणी घालून बारीक करून घ्यायचं, मंद आगीवर पातेलं ठेवून त्यात बांगड्याचे तुकडे टाकून चवीपुरतं मीठ घालायचं. हुमणाची चव तिखट आंबट असायला हवी. आंबटपणानं तिखटावर कुरघोडी केली तर सगळी चव बिघडते. म्हणून तिखट- आंबट प्रमाण सांभाळायला लागतं. बांगड्याप्रमाणंच त्यामानानं जास्त स्वस्त पण मस्त असणाऱ्या तारल्या आणि करल्या यांच्या हुमणाची चवही तितकीच हवीहवीशी वाटते. पण त्यांना येणारा काहीसा हिळवांड वास जाण्यासाठी तिरफळ, कोकम यांचा मारा थोडा जास्त करावा लागतो; हे करणारी किंवा करणाऱ्याच्या अदमासावर अवलंबून असतं. हे बिनकांद्याचं हुमण जसं करतात, तसंच कांद्याचंही करतात. कांदा बारीक चिरून इतर मसाल्यांबरोबर घालायचा, कांद्यासोबत कैरीचे तुकडे घालून केलेलं हुमण अधिक खुमासदार लागतं.शीत-कढीच्या ताटातलं हुमण सगळ्या गोमंतकीयांना हवंच. हुमणात सुरमाईचे, पापलेटचेही तुकडे घालतात. पण सुरमाई, पापलेट, चनक यासारखे मासे भाजलेले असतील, तर हमखास बांगड्याचं हुमण ताटात असतं...आणि हो, मासा कोणताही असो, सोलकढी मात्र पाहिजेच. पण मालवणी सोलकढी जशी नारळाच्या दुधापासून करतात, तशी गोव्याची नसते, इथं फक्त सोलं, लसूण, कोथिंबीर यांचाच वापर केला जातो, नारळाच्या दुधाची सोलकढी मिळणार नाही. हॉटेलमध्ये, भाजलेला मासा, हुमण याच्याबरोबर पापड आणि एखादी शाकभाजी, आंब्याचं लोणचं असतंच. थोड्या महागाच्या ताटात किसमूरही असतं.किसमूर म्हणजे सुक्या सुंगटाची किंवा झिंग्याची कोरडी कोशिंबीर. हा खरं तर तोंडी लावण्याचा प्रकार आहे, पण ज्यांना सुक्की मासळी आवडते, त्यांच्यासाठी किसमूर खाणं ही चैनच असते. कसं करायचं हे किसमूर? किनाऱ्यावर सुकवलेले बारके झिंगे भाजून घेतात. बारीक कापलेला कांदा, गरम मसाला, हळद, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, वाळलेल्या खोबऱ्याचा कीस, लिंबाचा रस, मीठ हे मिश्रण झिंग्यासह कालवून गोळे करतात. मंद आचेवर तवा ठेवून तेल गरम करतात. एकेक गोळा रवा आणि तांदळाच्या जाडसर पिठाच्या मिश्रणात बुडवून तव्यावर ठेवतात, वरून तेल सोडतात. खरपूस भाजून झाल्यावर नंतर ताटात घेऊन गोळे मोडून त्याचा चुरा केला जातो. हे किसमूर गरम किंवा गार कसंही रुचकरच लागतं. झिंग्याऐवजी कालव घालूनही किसमूर बनवता येतं, तेही स्वादिष्ट असतं. बांगड्याचंही किसमूर तयार करतात. सुकवलेला बांगडा निखाऱ्यावर भाजतात, त्याचा चुरा करतात, थोडं मीठ, थोडा मसाला, किसलेलं खोबरं घालून किसमूर बनवतात, याची चव भन्नाटच असते. घोलम्याचं किसमूरसुद्धा याच पद्धतीनं बनवलं जातं. किनारी भागातील काही आणि शहरातल्या माशाच्या जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या काही भोजनालयांमध्ये एका मोठ्या परातीसारख्या पसरट भांड्यामधून मोठ्या आकाराचे चनक, पापलेट, सरंगा, इसवण, तांबुसा, शेवंडा यासारखे महागडे शाही मासे अखंड दाखवायला आणतात. खवैय्यांनी त्यातला मासा पसंत करायचा. अर्ध्या तासात तोच मासा बनवून दिला जातो. ही झाली खासीयत, त्या शिवाय पाहिजे असल्यास "फिश करी राईस' ही थाळी वेगळी असतेच.सुरमाई अर्थात इसवण हा मासा खासच आहे. म्हणून तर त्याला गोव्यात "किंग फिश' म्हणतात. कोल्हापुरात किंवा महाराष्ट्रात अन्य ठिकाणी गिऱ्हाईकाला मासा कापून पावशेर, अर्धा किलो असा सोयीनुसार विकत घेता येतो. गोव्यात तसं नाही, इथं मासा अखंडच घ्यावा लागतो. एक सुरमाई जर दोन किलोची असेल आणि अखंड घेणं परवडणारं नसेल, तर मासा घेणारे आणखी एक- दोघे भागीदार शोधावे लागतात, पण तसे ते मिळतातही. एक अखंड मासा घेतल्यावर कापून देणारे लोक वेगळे असतात, त्यांच्याकडून ते कापून घ्यायचे. हे लोक दहा- वीस रुपये घेऊन मासे कापून देतात. ते इतके तरबेज असतात की, तीन भागीदार असले तर प्रत्येकाला समान आकाराचे तुकडे नीट करून देतात. हा प्रश्न इसवण, चनक, टोका यासारख्या मोठ्या आकाराच्या माशांबाबत येतो. पापलेट, सरंगा, बोंबील, बांगडा अशा माशांचा प्रश्नच नसतो. इसवण सहहा अखंड भाजला जात नाही. लहान आकाराचा इसवण असेल तर भरल्या बांगड्यासारखा भाजता येतो, पण त्याला चांगली चव येत नाही. मोठा इसवण व्यवस्थित कापून घेतला की, नुसते तिखट-मीठ-लिंबू आणि रवा लावला तरी तो मस्त तयार होतो. आमसुलाचा किंवा चिंचचा दाटसर कोळ लावूनही तव्यावर तेल टाकून छान भाजता येतो.लावयचा तर बांगड्याचा मसाला इसवण आणि पापलेटला चव देऊन जातो. इसवणचा मधला भाग भाजण्यासाठी वापरला, तर शेपूट आणि तोंडाचा भाग हुमणासाठी झकास. त्याचं हुमण बांगड्याच्या पद्धतीनं करतात. त्याची रुची भन्नाट असते. दुसऱ्या दिवशी तर ती अधिकच वाढते. खेडेगावात अगदी साध्या पद्धतीनं केलेल्या बांगड्याची चव अफलातून असते. ताजा बांगडा ओल्या गवतात घालून भाजतात वरून थोडासा मसाला किंवा नुसतं तिखट-मीठ लावून खातात. तेल अजिबात लावत नाहीत, तरी तो स्वादिष्ट लागतो.पापलेट हा श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांचा आवडता मासा. तसेच ज्यांना मासा खाता येत नाही, जे मासा खाण्याच्या बाबतीत "नवोदित' आहेत, त्यांच्यासाठी पापलेट अत्यंत सुरक्षित. मधला एकच काटा काढला की काम झालं. त्यांना लहान तुकडेसुद्धा खायला चांगले. पापलेट मोठ्या आकाराचा असेल तर लहान तुकडे करून घ्यावेत. लहान असला तर अखंड मासा चिरा मारून घेतात. लहान पापलेटचे तुकडे केले तर अगदीच बारीक होतात. बांगड्याचाच मसाला चिरांमध्ये भरून रवा किंवा तांदळाचं किंवा मक्याचं पीठ लावून तव्यावर किंवा कढईत थोडं थोडं तेल टाकून पापलेट दोन्ही बाजूंनी भाजावा. मटण, कोंबडी आणि मासा यात बराच फरक असतो, मासा लगेच शिजतो, लगेच भाजला जातो. म्हणूनच बहुतेक मत्स्यविशेष हे मंद आचेवर बनवतात. करपले तर त्यांची चव नष्ट होऊन जाते. तपापलेटच्या सुवासावरूनच भाजला गेल्याची बातमी समजते. चनक (गोव्यात चोनाक) हा मासा काही वेगळाच आहे. जे खास गोव्याच्या किनारपट्टीलाच सापडतात त्यातला हा मासा आहे. आकारानं हा चांगला हातभर असतो, पण लहानसुद्धा चवदार असतो. त्याचा काटा पापलेटसारखा नसतो. हा मासा कापतानाच तिरका कापतात. त्यामुळं काटा चुकवून तो खायला सोपा जातो. त्याचे काप काप बऱ्यापैकी पातळ असतात, पण मोठ्या आकाराचा चनक दुरदुरीत मसाल्यात अखंड भाजला तर जास्त चांगला लागतो. तिरफळ, सोलं, चिंचा अथवा कैरीचा उपयोग करून चनक अधिक चवदार बनवतात.तिसऱ्यां म्हणजे शिंपले हा गोमंतकीयांचा आणखी एक लाडका प्रकार आहे. तिसऱ्यां करताना खोबऱ्याचा वापर थोडा अधिक केला जातो. पण तिसऱ्या नीट धुतल्या नाहीत, तर रेती राहते आणि खाताना रंगाचा भंग होतो.तिसऱ्यांमध्ये मसाल्याचं महत्त्व जास्त असतं. धढईत तेल टाकून धने, लवंग, मिरी, जायफळ, वाळल्या मिरच्या तेलात खरपूस भाजून घेतात. नंतर कढईत पुन्हा थोडं तेल टाकून किसलेलं खोबरं आणि चिरलेला कांदा टाकतात. तोही भाजतात. आधी भाजलेला मसाला, खोबऱ्या- कांद्याचं मिश्रण, चिंच, ओली मिरची, हळद, लसूण हे पाणी घालून वाटून घेतात. कढईत पुन्हा तेल घालतात, ते तापल्यावर कांदे चिरून दोन अखंड मिरच्या घालतात. कांदा नीट भाजला की, त्यात तिसऱ्यां टाकतात. नंतर मसाल्याचं वाटण टाकून कोकमची सोलं, मीठ टाकावं आणि झाकण ठेवून दहा मिनिटांत काढतात. तिसऱ्यां कशाला लावून खाऊन खायच्या नसतात. त्या तशाच खायच्या. तिसऱ्यांतलं थोडंसं मांस मसाल्यासकट जिभेनं काढून चाखावं लागतं. ही चव चवीचवीनं चाखावी, तरच तिसऱ्यांची खुमारी कळते. आपण कोल्हापूर भागात कोळंबी म्हणतो, मालवणात चिंगूळ म्हणतात आणि त्यांनाच गोव्यात सुंगट म्हणतात. आंग्ल विद्या विभूषीत लोक प्रॉन्स म्हणतात. आपण आपल्याला कळण्यासाठी कोळंबी म्हणूया. अगदी लहान आकाराची कोळंबी म्हणजे आपण झिंगे म्हणतो. गोव्यात लहान झिंगे, त्याहून मोठी कोळंबी, त्याहून मोठी टायगर प्रॉन्स आणि त्याच्या पुढे त्याच आकाराचे, पण जास्त मोठे शेवंडे किंवा लॉबस्टर. सर्वसामान्य माणूस मध्यम आकाराची कोळंबी घेतो. त्यातही लाल आणि काळी अशा प्रकारची कोळंबी असतात. कापणं, काटा टाळणं असला प्रकार कोळंबीत नसतो. तो अखंड खायची. तेलात परतून असो, की, हुमण करून असो, ती तोंडाकडच्या टरफलासह अखंड खात जायचं. पण...हे करण्यापूर्वी कोळंबी स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं. कोळंबी स्वच्छ करताना आतला काळा धागा जर काढता आला नाही, तर बाहेरून कितीही आणि कसलाही मसाला लावला, तरी कोळंबी कडूजार होऊन जाते. म्हणून तो काळा धागा नीट काढता आला पाहिजे. कोळबीचं हुमण हे इतर हुमणांसारखंच करतात. पण कोळंबीमुळं त्याची चव बदलते. मसाला लावून तासभर ठेवल्यावर तो नीट मुरतो. मग त्याची लज्जत वाढते. भाजताना लावायचा मसाला हा बांगडा आणि पापलेटला लावतात तोच. पण रव्यात घोळवून आणि कोकमचा किंवा चिंचेचा दाटसर कोळ लावून कोळंबी भाजणं यामुळं चवीत फरक पडतो. पण कोळंबी ही सर्व काळात (आता तरी) मिळते. मच्छिमारी बंद असलेल्या काळातही ताजी कोळंबी मिळतात. कोळंबीचं वैशिष्ट्य हेच की, त्याची बिर्याणी उत्कृष्ट होते, म्हणजे अगदी अप्रतिमच. मध्यम किंवा लहान आधाराची कोळंबी बिर्याणीसाठी घ्यावीत. मटण किंवा अंड्याच्या बिर्याणीच्या पद्धतीनंच कोळंबीची बिर्याणी करतात. त्यातला कोळंबी हाच घटक वेगळा आणि महत्त्वाचा. काहीजण कोळंबीला आकारावरून गमतीनं काजू म्हणतात, पण काजूची चव आणि कोळंबीची चव यात काहीही साम्य नाही. कोळंबीमध्ये अंगभूत मीठ असतं, म्हणून वरून मीठ लावलं जात नाही. काही हॉटेल्समध्ये मातीच्या मडक्यात कोळंबीचं हुमण करतात, ते रात्रभर मडक्यात तसंच ठेवतात. दुसऱ्या दिवशी ते जास्त किंबहुना दुप्पट पैसे देऊन घेणाऱ्या खवैय्यांची संख्या काही कमी नाही.समुद्रातला खेकडा हा कितीतरी गोंयकार खवैय्यांच्या आवडीचा. हे लोक खेकड्यासाठी जीव टाकतात. लहान, मध्यम आणि मोठे अशा आकारात खेकडे मिळतात. काळे खेकडे विशेष चवदार असतात.सर्वत्र मिळणारा हा उभयचर आहे. खेकडा मसाला गोमंतकीयांच्या विशेष आवडीचा. एका कढईत तेल टाकून मंद आचेवर गरम केले जाते.त्यात कापलेला कांदा अन् खोबरं तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतात. हे बाहेर काढतात. नंतर धने, जिरे, मिऱ्या, लवंग दगडफूल, मिरच्या घालून नीट भाजून घेतात. हे मिश्रण गार होऊ देतात. त्यात हळद, चिंच, पाणी घालूनमग चांगलं वाटून घेतात. दुसऱ्या भांड्यामध्ये तेल घालतात आणि तापल्यावर पुन्हा कांदा घातला जातो. नंतर आवश्यकता असल्यास टोमॅटो चिरून घालतात, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न. ह्या मिश्रणात खेकड्याच्या ठेचलेल्या नांग्या आणि इतर तुकडे घातले जातात. हे सगळं चांगलं शिजल्यावर आधीचं वाटण घालतात. कोथिंबीर, लिंबू आवश्यकता असेल तसा उपयोग करतात. खेकडा हा पदार्थ मिळमिळीत चांगला लागत नाही, तो झणझणीतच हवा. काही कुशल गृहिणी खेकड्याचं लोणचंही चांगलं बनवतात. गोव्यात लोपा नावचा एक वेगळा, मऊ, सुळसुळीत मासा मिळतो. हा अगदी पातळ अन् गुलाबी रंगाचा असतो. लेपांना काटे नसतात, म्हणजे असं की ते जाणवत नाहीत. लेपाची त्वचा पातळ आणि त्याला घट्ट चिकटलेली असते. ती तोंडाजवळून नखानं काढावी लागते. हे कौशल्याचं काम असतं. एकदा ही त्वचा निघाली, की, आतला मांसल भाग मसाला लावून तळायचा.लेपांचं धबधबीत फार स्वादिष्ट होतं. बाजारात लेपांचा वाटा खंडून मिळतो. लेपा आधी बाहेरून धुऊन नखानं त्वचा काढतात. हुमणाचाच मसाला करतात, पण कांद्याचा वापर जास्त असतो. हा मसाला बारीक करून लेपा कापून घालतात. हुमणापेक्षा दाट असलेलं हे धबधबीत चपातीपेक्षा भाताबरोबर जास्त मस्त लागतं. हे आंबट किंवा तिखट हवं तसं मिरच्यांचं प्रमाण कमी-जास्त करून तिरफळाचं प्रमाणही बदलता येतं. अस्सल गोंयकार हा जसा मत्स्यप्रेमी असतो, तसाच तो खूप धार्मिक असतो. सगळ्या सणासुदीला तो ते ते पदार्थ करतो. श्रावणात आणि गणपतीच्या दिवसात मासा पूर्ण वर्ज्य. पण एक गमतीची गोष्ट अशी की, याच दरम्यान नीरफणस यायला लागतात. नीरफणस हा पिकण्यासाठी नसतो. तो भाजीसाठीच असतो. हा नीरफणस साधारणतः नारळाच्या आकाराचा असतो. त्याला फणसासारखे पण कमी टोकाचे काटे असतात. बाहेरून न सोलून त्याचे काप करतात आणि इसवण(सुरमाई)चा मसाला लावतात. तो तसाच भाजतात, त्याची चव इसवणच्या जवळची असते. मासा समजून डोळे मिटून खाल्ला तर चवही इसवणची येते असं म्हणतात. नीरफणसाचे काप खाल्ल्यानं मासा खाल्ल्याचं समाधान आणि न खाल्ल्याचं पुण्यही मिळतं. अनेक कुटुंबामध्ये गणपती जाण्याच्या दिवशी आधीच मासा आणून मागच्या दाराला पिशवी टांगून ठेवतात आणि गणेशाचं विसर्जन करून आल्यावर मासा घरात घेऊन स्वयंपाकाच्या तयारीला बायका लागतात. अनेक शेतकरी देवचाराला (गावच्या राखणदाराला) रोट वाहतात, ह्या रोटात सुकी मासळी असते.भाताची पेज हा गोव्याच्या खेड्यांतील संस्कृतीचा भाग आहे. पोट भरणारी, पचायला हलकी, चवदार आणि स्वस्त, कुणालाही परवडणारी ही पेज सर्वांच्या आवडीची असायची. आताही, पेजेचं प्रस्थ कमी झालं असलं तरी संपलेलं नाही. एके काळी शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मधल्या वेळचं खाणं म्हणून पेज आणायला सांगितलं जायचं. गावोगावी वरीची आणि नाचणीची आंबील आजही आवडतं पेय आहे. रात्री मडक्यात आंबील तयार करून निखाऱ्यावर ठेवतात. रात्री कधीतरी निखारे थंड होतात. त्याबरोबर आंबील गार होत जाते. ती सकाळी प्यायची.खारवलेली कैरी हा नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटावं असा एक रुचकर पदार्थ आहे. हा साठवणीचा प्रकार आहे. उन्हाळ्यात खेड्यात "पुरमेंताचे फेस्त' होत असतं ह्या फेस्तात सुकी मासळी आणि साठवणुकीच्या वस्तू मिळतात. ह्या फेस्तात किसमुरात वापरला जाणारा मूळ पदार्थ (बांगड्याचा, घोलम्याचा चुरा तसेच बारीक झिंगा इत्यादी) मिळतो. खारवलेली कैरीसुद्धा फेस्तात असते. ही तयार करण्याची रीत अगदी सोपी आहे. मध्यम आकाराच्या कैऱ्या घेऊन त्यांचा डिंक काळजीपूर्वक पुसतात. ह्या कैऱ्या विशिष्ट झाडांच्याच असतात. करायची रीत सोपी असते, फक्त कैऱ्या कोणत्या निवडायच्या याचं कौशल्य असतं. लाकडाचं उभट भांडं घेऊन त्यात मिठाचं पाणी घालतात. त्यात कैऱ्या घालून ठेवतात. वजनदार झाकण लावून पंधरा दिवस ठेवल्यावर कैऱ्या खायला काढतात. खारं पाणी कैरीत मुरल्यावर ती टिकाऊ तर होतेच, पण तिच्या चवीला तोड नसते. काजूची फेणी हा गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य असा घटक आहे. जातीवंत फेणी पिणारे गोंयकार चखणा म्हणून खारवलेली कैरी तोंडी लावतात. ही कैरी असली तर त्यांना माशाचीही मातब्बरी वाटत नाही. गोमंतकीय माणूस गावठी आळंबीचाही भोक्ता आहे. गर्द वृक्षराजीत मिळणाऱ्या आळंबीच्या कळ्या बायका सकाळी काढून आणून रस्त्यावर उभ्या राहून विकतात. ही आळंबी माशापेक्षाही महाग असते.पाचशे ते साडेसातशे रुपयांना शंभर आळंबी असा दर असतो. सागवानाच्या किंवा केळीच्या पानात बांधून बायका आळंबी विकतात. ही आळंबी मातीनं माखलेली असतात. ती धुऊन बारीक कापून कांद्याच्या मसाल्यात झणझणीत किंव कमी तिखटाचीसुद्धा दुरदुरीत केल्यावर चांगली लागतात. चव कोल्हापुरी मटणाची आठवण करून देणारी. कृत्रिमरित्या बनवलेल्या आळंबी बाजारात मिळतात, त्यांचा खप होतो, पण ज्याच्यावर "उड्या पडणं' असं म्हणतात, तशा लोकांच्या उड्या पडत नाहीत. अनेक हॉटेल्समध्ये "मश्रूम ब्रेड' नावानं विकल्या जाणाऱ्या आळंबीच्या भाजी-पावाला चांगली मागणी असते, ही आळंबी मुद्दाम तयार केलेली असतात. बाजारात गावठी भाज्यांना चांगली मागणी असते. अळूची पानं, टायखुळा, नीरफणस, दुधी भोपळा, लाल भोपळा, तेरा, सुरण, शेवगा, बटाटा विकणारे बायका आणि पुरुष शहराबाहेरच्या रस्त्यांवर उभे राहून विक्री करतात. गावठी कांदाही लोक आवडीनं जेवणात वापरतात. जुना गोवा, फोंडा रस्ता इथं भाज्यांची दुकानंही आहेत. गोवा राज्य फलोत्पादन संघाची भाजी विक्री केंद्रेही तालुक्याच्या ठिकाणी आहेत. गोव्यात रुचीपालट म्हणून कोंबडी, बोकडाचं मांसही खातात. पण जे स्थान माशाला आहे, ते कशालाही नाही. सर्व प्रकारचे मासे, खेकडे, तिसऱ्यां, शिनाने (मोठे शिंपले), खुबे (समद्रकिनाऱ्याच्या दगडाला चिकटलेले जीव) यांच्यातच खऱ्या गोमंतकीयाचा जीव रमतो. अशी ही गोमंतभूमीची चव!-
श्रीराम ग. पचिंद्रे,
संपादक, दै. "गोमन्तक',पणजी- गोवा.