Tuesday, 6 February 2018

कवीदादा
------------
श्रीराम पचिंद्रे यांच्या फुलोरा या पहिल्या काव्यस्रग्रहाच्या प्रकाशन समारंभात   त्यांचा सत्कार करताना कवी सुधांशु. छायाचित्रात डावीकडे बसलेले अंबादास माडगूळकर आणि  प्रा. भैरव कुंभार, रा. वा. शेवडे गुरुजी.
दि. 5 सप्टेंबर 1982

छायाचित्र -गुलाब मणेर
---------------------------------------------------------------------------------------------------------
कवीदादांशी अधूनमधून पत्रव्यवहार सुरू होता. एके दिवशी अचानक ‘महत्त्वाचे कामआहे, जमल्यास औदुंबरला येऊन जा’ असं दादांचं पोस्टकार्ड आलं. मी गेलो. दादांनी त्यांच्या काव्यसंग्रहाचं हस्तलिखित माझ्यासमोर ठेवलं आणि पुनर्लेखन करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांचे हात थरथरत होते. तसं माझं हस्ताक्षर काही सुंदर मानलं जात नाही, पण दादांना ते निदान चांगलं आहे असं वाटलं. दोन बैठकांमध्ये मी त्यांच्या ‘यात्री’ संग्रहाचं पुनर्लेखन मी पूर्ण करून दिलं. मी नको नको म्हणत असताना त्यांनी प्रवास खर्चाचे पैसे माझ्या खिशात बळजबरीनं कोंबले.त्या संग्रहात माझा नामोल्लेख दादांनी मोठ्या आस्थेनं केला.
--------------------
1978 चा जानेवारी महिना. मी अकरावीत प्रवेश घेतला होता. एके दिवशी वृत्तपत्रात बातमी आलेली दिसली. सांगली जिल्ह्यात औदुंबर नावाच्या गावी ‘सदानंद साहित्य संमेलन’ भरणार आहे. गेली अनेक वर्षे ते संमेलन भरत असत.
त्या आधी कुठल्याच मोठ्या कवी संमेलनात भाग घेतला नव्हता. आमच्या वडिलांना मी औदुंबरच्या संमेलनाला जायची इच्छा असल्याचं सांगितलं. त्यांनी परवानगी आणि पैसे दिले. मग 14 जानेवारीदिवशी मी लाल रंगाच्या रा. प. मार्ग परिवहन मंडळास बसनं गेलो. आई होती माझ्यासोबत. बसमध्ये सारे कवीच भरले होते. औदुंबरला पहिल्यांदाच गेलो होतो. मी आणि आईनं दत्ताचं दर्शन घेतलं. मग संमेलनस्थळी गेलो. एक भलं मोठ्ठं वडाचं झाड होतं. बाजूला साधं व्यासपीठ, त्यावर मान्यवर कवी, लेखक आणि जमिनीवर अंथरलेल्या मोठ्या जाजमांवर श्रोते आणि इतर कवीसुद्धा बसलेले. जाऊन नाव नोंदवलं.
नाव पुकारल्यावर जाऊन कविता सादर केली. पहिल्यांदा भ्यालो, पण नंतर भीती गेली. कविता भारतीय संस्कृतीविषयी होती. वाचन संपल्यावर थोड्या टाळ्या पडल्या. बरं वाटलं मी गेल्या व्यासपीठांवरील खुर्च्यांवर बसलेले मान्यवर कोण कोण आहेत हे पाहिलं. त्यात प्रथमदर्शनीच एक व्यक्ती मनात ठसली. शुभ्र गांधी टोपी, शुभ्र सदरा आणि धोतर. नाक तरतरीत, चेहरा गंभीर पण उत्सुक. नंतर समजलं, हेच ते कवी सुधांशु, याच संसमेलनात एका उत्साही प्राध्यापकांचा परिचय झाला. वैजनाथ महाजन! कवी सुधांशु आणि महाजन सर या दोघांशी झालेला परिचय पुढं अतिशय दृढ झाला. सुधांशू यांना सारेच कवीदादा म्हणायचे, कवीदादांचा माझ्यावर अखेरपर्यंत लोभ राहिला.
दादा दत्तभक्त होते. त्यांनी लिहिलेली.
‘दत्त दिगंबर दैवत माझे
हृहयी माझ्या नित्य विराजे’
यासारखी अनेक भक्तीगीते त्यांना अंतःकरणाच्या तळापासून स्फुरलेली होती.
त्यांचा काव्याचा झरा समोरून वाहणार्‍या निर्मळ कृष्णा नदीसारखाच निर्मळ आणि नैसर्गिक होता.
‘दत्त दिगंबरा’ हे गीत असो की,
‘देव माझा विठू सावळा
त्याची माझीया गळा’
हे भावमधूर गीत असो. कवीदादांना पाहण्यापूर्वी अनेकदा आमच्या घरच्या सर्वांनी ती ऐकली होती. मनापासून आवडत होती. ती लिहिण्यार्‍या कवीला समक्ष पाहणं हा माझ्या कोवळ्या वयातला एक थरारच होता.
नंतरच्या काळात पं. वसंत अगजगावकर यांनी गायलेलं कवीदादाचं नितांत सुंदर भावगीत आकाशवाणीवरून कानी पडलं.
भुलविलेस साजणी तू विलोल लोचणी,
फुलविलेस मन्मनी स्वप्न एक कांचनी...
वा! विलक्षण सुंदर. इतकं सुंदर हळवं प्रेमगीत नंतर क्वचित कानी पडलं असेल.
हे गीत एका नवथर प्रेमिकाचं नाही. तर पत्नीवर जिवापाड प्रेम करणार्‍या एका पतीचं आहे. पत्नीच्या सेवाभावी स्वभावानं दिपून. भारावून गेलेला पती तिला उद्देशून आपल्या भावना व्यक्त करत आहे.
तू न रूपगर्विता
तू न धुंद चारूता
सांज सावळीच तू सांडीलीस मोहिनी...
तू न गायिका कुणी
गायिलीस रागिणी
बोल लाजरे तुझे गीत फुलविती मनी...
तु सुशील साधिका
स्नेहशील दीपिका
प्रेमभाव उधळुनी जाहली स्वामिनी...
असं तीन कडव्याचं भावगीत आहे. पण तेवढ्यात पती-पत्नीच्या प्रेमाचं महाकाव्य बहरलेलं आहे.
कवीदादांच्या एकूणच सगळ्या काव्यात एक उत्कटता आणि प्रासादिक माधुर्य आहे. रसिकाला आपलंसं करणारा जिव्हाळा आहे.
त्या साहित्य संमेलनानंतर मी आणखी काही वेळा गेलो. नंतर मला कवीदादांनी स्वतः लिहिलेल्या माझ्या नाव पत्त्यानं निमंत्रण पत्रिका दरवर्षी येत राहिली. संक्रांती दिवशीच हे संमेलन भरतं. कवीदादा गेल्यानंतरही ते तिकक्याच उत्साहानं त्याच दिवशी भरत आलेलं आहे. इतर छोट्या संमेलनाप्रमाणंच एक कवीसंमेलन असतं. किंबहुना कवीसंमेलनालच जास्त महत्त्व असतं. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जसा मान्यवर असतो, तसा कवीसंमेलनाचाही महत्त्वाचा असतो.
औदुंबरच्या पलिकडे भुवनेश्‍वरवाडी हे गाव आहे. नदीतून नावेतून पलीकडे जावं लागतं. पैलतीरावर भुवनेश्‍वरी देवीचं काळ्या पाषाणातील हेमाडपंथी मंदिर ाअहे.
थोर ग्रामीण कथाकार म. भा. भोसले हे कवीदादांचे मित्र याच गावचे. मराठी समीक्षेनं त्यांच्याएवढी उपेक्षा क्वचित कोणाची केली असेल.
एका वर्षी मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट हे दोन दिग्गज एकाच वेळी आले होते. ते दोघेही कवीदादांच्या स्नेहातले होते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे औदुंबरचेच. संमेलनाच्या आयोजनात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. तेही होते. त्यादिवशी दुपारी सहभोजन झाल्यावर पाडगावकर, बापट आणि कवीदादा यांच्यासह नावेतून भुवनेश्‍वरवाडीला गेलो. नावेतून येता-जाता तिघांच्या कविता ऐकण्याचा आनंद लाभला. रात्री बापटांनी लावण्यात रंग भरला. पण चावट लावण्या ऐकताना संकोचून गेलेला कवीदादांचा सात्विक चेहरा माझ्या अजून डोळ्यासमोर आहे. मराठीतले बहुतेक सगळे मान्यवर लेखक-कवी औदुंबरच्या सदानंद साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले. कवीदादांचा लोभच तसा होता. सुरुवातीपासून  कित्येक वर्ष असं घडत गेलं होतं की, जो लेखक औदुंबर संमेलनाचा अध्यक्ष होई, तो नंतर लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचा. कसं कुणास ठाऊक, पण हे घडलं खरं!
या बर्‍याच कविता लिहून झाल्या. कुणीतरी मला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेसाठी माझा काव्यसंग्रह पाठवावा, असं सुचवलं. मी कविता संग्रहित केल्या. म. रा. सा. सं. मंडळाकडे हस्तलिखित किंवा टंकलिखित पाठवताना त्याला मान्यवर लेखक-कवि-समीक्षकाची प्रस्तावना किंवा शिफारस हवी अशी अट होती. आधी दूरध्वनी करण्याची सुविधाच नव्हती. भ्रमणध्वनीचे तर नावच नव्हतं. पत्रही न पाठवता मी थेट औदुंबरला कवीदादांकडे गेलो. पण त्यांना माझ्या कविता पसंत पडल्या नाहीत. एखाद-दुसरी कविता आवडली, पण एवढ्यातच संग्रह काढू नये असं ते म्हणाले. मी निराश होऊन परतलो. पण त्यामुळं कवीदादांवर नाराज मात्र झालो नाही.
दीपक भागवत हा माझा ज्येष्ठ मित्र होता. त्याच्या बरोबर मी नानांकडे गेलो. नाना म्हणजे प्रख्यात चित्रपटकवी जगदीश खेबूडकर. आम्ही नानांच्या मंगळवार पेठेतल्या नूतन मराठी विद्यालयासमोर असलेल्या घरात गेलो. दीपकची त्यांच्याशी बरीच जवळीक असलेली दिसली. त्यांनी प्रस्तावना द्यायचं मान्य केलं. हस्तलिखिताची प्रतिलिपी मी त्यांच्या हाती सोपवली, तो मार्च महिना होता. साहित्य संस्कृती मंडळाकडे हस्तलिखित पाठवण्याचा शेवटचा दिवस होता. 31 मे मी नानांच्या घरी सात-आठ हेलपाटे घातले. पण त्यांनी  माझ्या कविता वाचल्याही नव्हत्या. मेच्या शेवटच्या आठवड्यात मी त्यांच्याकडे पुन्हा गेलो. तेव्हा, ‘अरे, आता आणखी चार महिने तरी मला सवड नाही, मी तुला ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावना देतो. कधीपर्यंत पाठवायचं आहे अनुदानासाठी?’ मी म्हटलं, ‘नाना, 31 मे हा शेवटचा दिवस आहे.’
‘असं होय? मग पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात पाठव. जगदीश खेबूडकरची प्रस्तावना मिळणार असेल तर एक वर्ष थांबलास तरी काही बिघडत नाही’.
आपल्या नावावर जोर देत नाना म्हणाले, मी खट्टू झालो, पण त्यांच्याकडे असलेली प्रत परत मागायचा धीर मला झाला नाही.
त्यावेळी कविवर्य नारायण सुर्वे हे मंडळाचे  अध्यक्ष होते. समीक्षक डॉ. एस. एस. भोसले हे त्यांचे स्नेही होते. आमच्या नाईट कॉलेजचे प्रा. भैरव कुंभार यांच्या ओळखीने मी त्यांच्याकडे गेलो. भोसले सरांनी नारायण सुर्वे यांच्या नावाने पत्र लिहून दिले. एकदा महाविद्यालयात माडगूळकरांची धाकटी पाती डॉ. अंबादास माडगूळकर हे आले होते तेव्हा त्यांची ओळख झाली होती. कुंभार सरांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडेही मी प्रत दिली होती. त्यांनी सुंदर अभिप्राय लिहून दिला. तो माझ्या त्या ‘फुलोरा’ काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर छापलेला आहे.
झालं संग्रह मंडळाकडे पाठवला. 1800 (एक हजार आठशे) रूपयाचं अनुदान मंजूर झालं. एक दोन अडथळे येऊन अनुदानाचा धनादेश प्रकाशक रा. वा. शेवडे गुरुजी (प्रसिद्ध बालवाडमयकार व भाऊसाहेब खांडेकरांचे लेखनिक) यांना मिळाला. वरचे सहाशे रुपये घालून त्यांनी संग्रह एकदाचा छापला.
काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कुंभार सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित केला. सरांनी कवी सुधांशू यांना बोलावलं. ते आंनदानं आले. कोल्हापूरला स्वतःच्या खर्चानं आले आणि गेले. चांगलं बोलले. अंबादास माडगूळकरही आले. अप्रतिम बोलले.
कवीदादांशी अधूनमधून पत्रव्यवहार सुरू होता. एके दिवशी अचानक, ‘महत्त्वाचे काम आहे. जमल्यास औदुंबरला येऊन जा’ असं दादांचं पोस्टकार्ड आलं. मी गेलो. दादांनी त्यांच्या काव्यसंग्रहाचं हस्तलिखित माझ्यासमोर ठेवलं आणि पुनर्लेखन करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांचे हात थरथरत होते. तसं माझं हस्ताक्षर काही सुंदर मानलं जात नाही. पण दादांना ते निदान चांगलं आहे असं वाटलं. दोन बैठकांमध्ये मी त्यांच्या ‘यात्री’ संग्रहाचं पुनर्लेखन मी पूर्ण करून दिलं.मी नको नको म्हणत असताना त्यांनी प्रवास खर्चाचे पैसे माझ्या खिशात बळजबरीनं कोंबले.ेत्या संग्रहात  माझा नामोल्लेख दादांनी मोठ्या आस्थेनं केला.
ते हयात असेपर्यंत औदुंबरच्या कवी संमेलनाचा अध्यक्ष होण्याची माझी इच्छा होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर सन 2008 मध्ये तो योग आला. ज्या संमेलनात मी नवोदित कवी म्हणून प्रवेश केला. तिथला अध्यक्ष झालो. पण ते बघायला कवीदादा नव्हते.
‘रुद्राक्षांच्या नकोत माळा नको त्रिकाळी स्नान
भुकेला भक्तीला भगवान’
असं सहजपणे लिहून गेलेले एक शांत, सात्विक, स्वच्छ, पूर्णपणे निर्व्यसनी, भाविक, दत्तभक्त, नवोदितांना निरलसपणे मार्गदर्शन करणारे असे हे दुर्मिळ व्यक्तिमत्वाचे श्रेष्ठ मराठी कवी औदुंबरात होऊन गेले. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी होऊन गेली.
- श्रीराम ग. पचिंद्रे
कार्यकारी संपादक,
दैनिक, पुढारी,
कोल्हापूर



शिर उंच उंच राहो हिमवंत पर्वताचे...

श्री

काश्मीरची साद- 5
श्रीराम ग. पचिंद्रे
शिर उंच उंच राहो हिमवंत पर्वताचे...
आतापर्यंत नागरिक, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन महामंडळाचे अधिकारी, राजकीय नेते, पोेलिस अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. आम्हांला उत्सुकता होती ती मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटण्याची. एकच दिवस आधी भेटीचा दिवस निश्‍चित झाला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी एका मशिदीजवळ जमलेल्या मुस्लिम समुदायानं तिथं आलेल्या एका तरुण पोलिस उपअधीक्षकाला मारहाण करून ठार मारलं. तोही मुस्लिमच. वातावरण तापलेलं. रमजानच्या महिन्यातच हे घडल्यानं श्रीनगरमध्ये सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीसुद्धा ह्या हत्येमुळं अस्वस्थ झाल्या होत्या.
तो त्यांच्या सुरक्षेसाठी गेला होता. मैं अपना आदमी हूँ असं तो मारहाण करणार्‍यांना सांगत होता. आपले लोक आहेत ह्या भावनेनं तो एकटाच गेला होता. फौजफाटा सोबत नव्हता. ऐसे मुबारक महिने में ये बुरा हुआ, त्या म्हणाल्या. 
पण काश्मीरमध्ये सध्या तरुण पिढीची जी विधायकतेच्या दिशेनं वाटचाल चालू आहे, तिकडे मेहबूबा यांनी लक्ष वेधलं. काश्मीरमध्ये जे वाईट घडतं, तिकडेच सारा भारत पाहतो, पण चांगल्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. लोकांना जगायचंय, जिवंत रहायचंय. वातावरण खराब असूनही शिक्षण आणि खेळामध्ये काश्मिरी मुलं-मुली आघाडीवर आहेत. लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण गुड न्यूज इज नो न्यूज अशी वृत्तवाहिन्यांची लख्ख भूमिका असल्यामुळं असलं काही वाहिन्या दाखवत नाहीत. दगडफेकीच्या घटना चोवीस तास दाखवल्या जातात. उनको तो टीआरपी बढाना होतात है. दगड फेकणारे तरुण स्वतःला टीव्हीवर पाहतात, तेव्हा त्यांना आपण काहीतरी मोठं काम केलंय, हम हीरो बन गये, असं वाटतं. मग त्याहून भयंकर कृत्य करायला ते प्रवृत्त होतात, काश्मीरमध्ये दंगल घडवणं हा काही लोकांचा उद्योग झालाय, मसला प्रायोरिटी नहीं बनता, अपना फायदा प्रायोरिटी बनता है...मेहबूबांच्या बोलण्यात खंत जाणवत होती. काश्मिरला दररोज सुमारे बारा हजार पर्यटक यायचे, ती संख्या आता निम्म्याहून कमी आली आहे.
काश्मीरमधील धार्मिक सलोख्याबद्दल मेहबूबा म्हणतात, आमच्याजवळ अमरनाथजी है, माता वैष्णोदेवी है. आम्हां सर्वांनाच त्यांच्याविषयी श्रद्धा आहे. भारतभरातून भाविक येतात. आम्ही लोक इकडून अजमेर शरीफला जातो, निजामुद्दिनला जातो. पर्यटकांना वाचवताना एका शिकारावाल्याचा मृत्यू झाला होता, वैष्णोदेवी दुर्घटनेत भाविकांना सहकार्य केलं. यात्रेतही आम्ही सहकार्य करत असतो.  लेकिन टीव्ही चॅनेलवाले नफरत बढा रहे है. आम्ही शेती- बागायतीच्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे, श्रीनगर स्मार्ट सिटीमध्ये निवडलं गेलंय, याची दखल घेतली जात नाही.
पुन्हा अटल बिहारींचा उल्लेख आला. त्यांच्या काळात लोक भयमुक्त होते. त्यांनी चांगलं वातावरण निर्माण केलं होतं. काहीतरी चांगलं होतंय याची जाणीव लोकांना झाली होती. ते आणि मुफ्ती साहेब यांच्यात चांगला स्नेह होता. दोघं एकमेकांचं ऐकत होते. हा देशाचा प्रश्‍न आहे, याची जाणीव त्यांना होती.लेकिन अब हालात ऐसे मुश्किल है कि दहशतवाद्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली तरी देशद्रोही ठरवलं जातंय. आम्ही सभ्यतेला, कश्मिरीयतला महत्त्व देतो. वाजपेयींच्या काळात चांगली सुरुवात झाली. आजपर्यंत जे जे पंतप्रधान झाले, त्यांच्यासमोर काश्मीर हाच मोठा प्रश्‍न होता. प्रत्येकानं काही ना काही तरी काम केलेलं आहे. हा राजकीय प्रश्‍न आहे, तो चर्चेनेच सोडवला जाईल. आणि आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच असे आहेत की, जे काश्मीरचा प्रश्‍न सोडवू शकतात. हा प्रश्‍न सोडवला, तर नोबेल ते पुरस्काराचे मानकरी ठरतील, असाही मेहबूबा यांचा विश्‍वास आहे.
भारताची पुण्यभूमी, विजयी समरांगण असलेल्या कारगिलला जायला दुपारी निघालो. हजरतबल, गंधरबल अशी गावं करत करत आम्ही पुढं चाललो. वाटेत काही ठिकाणी पोलिसांची गर्दी दिसत होती. तसं त्या भागात सारखं काहीतरी घडत असतं. सगळाच भाग संवेदनाशील म्हणावा असा. मेहबूबा यांनी आम्हांला सोनमर्गपर्यंत सशस्त्र पोलिसांचं संरक्षण दिलं होतं. तिथून पुढं भारतीय सैन्यदलाचा खडा पहारा जागोजागी होता, स्थानिक पोलिसांची आवश्यकता नव्हती. जाताना आमच्याबरोबरच इंडस नदी खळाळत उफाळत वाहात होती. तिचं शुभ्र फेसाळतं पाणी पाहून एक वेगळाच उत्साह वाटत होता. डोंगराळ वाटेनं, अवघड घाटातून जाताना इंडस नदीच्या पाण्याचा हा प्रवाह सोबत करतो. त्याचा थंडगार स्पर्श न करताही, दुरूनही मला जाणवला.
गाड्या हळुहळू पुढे जाऊ लागल्या. चढण वाढत गेली, तसा वेग मंदावला. डाव्या बाजूला बर्फाळ कडा उजवीकडे दरी. जोझीला पासची अवघड वळणं लागली. बर्फाचे थर वितळून आतल्या भागातून पाणी बाहेर येत होतं. त्यामुळं रस्ते खचले होते, रस्त्याच्या कडा तुटल्या होत्या. खूप कुशल चालकच तिथून गाडी काढू शकतो. वरून खालच्याजोझीला पास संपला सोनमर्ग आलं. तिथं सैन्याची छावणी आहे; तसेच दुचाकी गाड्यांवरून कारगिल, लेह- लडाखला जाणारे अनेक साहसी पर्यटक तंबू मारून राहिलेले असतात. नंतर द्रास लागलं. अगदी लहान गाव. तिथं युद्ध सुरू झालं होतं. तिथं भूदलाचं विश्रामधाम आहे. तिथून उंच डोंगरांवर पहारा देत असलेले जवान दिसत होते. भारत- पाकिस्तानच्या सरहद्दीवर ऊन्ह, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, बारा महिने चोवीस तास कडाक्याच्या थंडीचा मारा सहन करत, डोळ्याला डोळा न लागू देता पहारा करत, शत्रूसैन्याच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या भारतीय सैन्याकडे पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो. हे खरे देशाचे नायक म्हणायचे... आपण पडद्यावरच्या खोट्या चित्रांना नायक समजतो!
कारगिलला पोहोचायला रात्र झाली. हे एक ऐसपैस शहर आहे. तिथल्या हॉटेल कारगिलमध्ये सर्व पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
सकाळी सुरू व्हॅलीकडे रवाना झालो. आम्ही जवळजवळ पाकिस्तानच्या सहहद्दीपर्यंत पोहोचलो होतो. पर्वताच्या पलीकडे पाकिस्तानची हद्द सुरू होते.
कारगिल शहराच्या बाहेर पडून सुरू खोर्‍याकडे निघालो. वाटेत खुंबूथांबू गाव लागलं, तिथं सैन्याची छावणी होती. जवळच काश्मीर विद्यापीठाची कारगिल शाखा होती. तिथून पुढं ब्यामखुंबू गावाजवळ वाटेवरच एका पाषाणावर गौतम बुद्धांची आकृती कोरलेली आहे. हे कोरीबकाम सातव्या शतकातलं आहे. त्या काळात चंबा राजाची राजवट होती. बुद्धांच्या कोरीव प्रतिमेच्या खाली घोड्यावरच्या स्वाराची प्रतिमा कोरलेली आहे, ती चंबा राजाची आहे असं मानतात. बौद्ध धम्म (महायान पंथ) इथून जगभर पसरला असं इथले रहिवासी मानतात. इथले हिंदु आणि मुस्लिम रहिवासीही बुद्धांविषयी आदर बाळगतात, असं त्यांनी सांगितलं. जगातल्या शुद्ध हवेच्या ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे. तिथल्या हवेत श्‍वास घेताना याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. हा सगळाच परिसर अत्यंत शुद्ध हवेनं भरलेला आहे. पर्यटकांच्या गाड्यांच्या धुरानं जे होत असेल, तेवढंच प्रदूषण; माझ्या मनात अपराधी भावना आली.
तिथून काही अंतरावर संकू हे गाव आहे. संकू ह्या गावापासून डाव्या बाजूने सहा किमी अंतरावर गेल्यावर करचेकर गाव लागतं. ह्या गावात एका प्रचंड शिळेवर मैेत्रेय गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती आठ मीटर उंच आहे. मस्तकाच्या दोन्ही बाजूला गंधर्वांच्या मूर्ती आहेत. म्हणून मैत्रेय गौतम बुद्ध असं म्हणतात. बुद्ध दागिन्यांनी सजलेले आहेत असं दाखवणारी ही मूर्ती आहे. ह्या भागात मूर्तीला चंबा म्हणतात. शनिवारचा दिवस होता. मुलं- मुली
शाळेतून परत येताना दिसत होती. त्यांचे निरागस चेहरी आम्हांला पाहून फुलत होते, सगळी मुलं आमच्याकडे बघून हात हलवत होती. मंगोल वंशाच्या लोकांचे असतात, तसे ह्या मुलांचे, एकूण इथल्या रहिवाशांचे चेहरे दिसतात.
कारगिल परिसरात तीन ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती आहेत. त्यातल्या दोन आम्ही पाहिल्या. पाचव्या शतकात नमग्याल राजांची राजवट होती. नमग्याल राजानं बाल्टिस्तानमधील इस्लामी राजकन्येशी प्रेमविवाह केला. आपल्याबरोबर एक इस्लामी विद्वान घेऊन यायला परवानगी दिली, तरच लग्न करणार अशी तिनं अट घातली. तिच्या सौंदर्यावर लुब्ध झालेल्या राजानं ती अट मान्य केली. तिच्या बरोबर आलेल्या इस्लामी विद्वानानं इस्लाम धर्माचा प्रसार केला आणि इथं इस्लामीकरण झालं, असं रहिवासी सांगतात. काश्मिरी लोक सहज बोलतानाही भांडतात असं वाटतं, ते काश्मिरी भाषेचं वैशिष्ट्य आहे. ह्या भागात वीज निर्मिती केंद्र आहे. पण इथली वीज बाहेर जाते. बुद्धांची मूर्ती पाहून आम्ही परत संकू गावात येऊन पुन्हा सरळ पुढे गेलो. तिथून पुढं सुरूचं खोरं (व्हॅली) सुरू होतं. इथल्या नदीचं नावही सुरूच आहे. सुरू नदीचं पाणी इंडस नदीपेक्षा शुभ्र आहे. इथल्या हिमावर धूळ साचून रहात नाही. ते धवलशुभ्र हिम वितळूनच पाणी प्रवाहित होतं. ते पाणी अतिशय थंड असलं, तरी त्याच्या विलक्षण चवीसाठी पिऊन पहायलाच हवं. समोरच जंबुरा नावाचं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं बर्फाच्छादित शिखर दिसत होतं.
दुपारी कारगिल पर्यटन विभागाचे चेअरमन आमदार हाजी अनायत अली आणि त्यांचे सहकारी व पर्यटन व्यवसायातले इतर लोक भेटले. इथून जवळच सरहद्द असल्यानं विकासाला मर्यादा येते. वास्तविक कारगिल ही युद्धभूमी असली तरी एरवी इथं शांतता असते. आपलं पराकमी सैन्य सदैव जागरूक असतं. कारगिलच्या रहिवाशांना मराठा योद्ध्यांविषयी खूप आदर आहे, तो ते बोलून दाखवतात. शत्रूने घुसखोरी केल्याची पहिली बातमी कारगिलच्या बकरपालाने  दिली, त्यामुळं हा सगळा परिसर देशभक्तीनं भारलेला आहे. ङ्गशिर उंच उंच राहो, हिमवंत पर्वताचे...आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेफ ही इथल्या नागरिकांची तीव्र भावना आहे. आम्ही तिरंग्याचा एवढा आदर करतो की, आमच्या इस्लामिक महोत्सवातही तिरंगा फडकावला जातो, असं अनायत अली म्हणाले.सगळा पहाडी परिसर आहे. कारगिल ते गुरेझ हा मार्ग सुरक्षेच्या कारणावरून सध्या बंद आहे. तिथं पाहण्याजोगे जुने किल्ले आहेत. श्रीनगर ते कारगिल आणि कारगिल ते गुरेझ अंतर सारखंच आहे. हा खुला झाला तर एक दिवसाची चांगली सहल होऊ शकते. 11 हजार 300 फूट उंचीवर हा प्रदेश आहे. ह्या जिल्ह्यात नऊ नद्या आहेत. त्यातल्या काही पाकमधून येतात. पहाडी भागात अनेक तळी आहेत. शेती आणि पशुपालन हा इथल्या प्राचीन अर्थकारणाचे मूळ आहे. पण आता त्याचं फारसं योगदान राहिलेलं नाही. त्यांच्याजवळ आता पर्यटनाशिवाय काहीच नाही. फाळणीमुळं पूर्वीचा नैसर्गिक रस्ता बंद झाला. इकडे सात हजार मीटर उंचीवरची शिखरं आहेत, त्या तळछावणीपर्यंत वाहनं नेता येतात. श्रीनगर ते कारगिल हेलिकॉप्टर सेवासुद्धा आहे, पण ती असल्याचं फारसं कोणाला माहीत नाही, त्यामुळं प्रतिसाद नाही. इथला महिलांचा हॉकी संघ राष्ट्रीय पातळीवर तयार होत आहे. हे लोक स्वतःला लडाखचे रहिवासी म्हणून अभिमान बाळगणारे आहेत. त्यांची भाषाही वेगळी आहे. हिंदु- मुस्लिम सलोखा आहे. बाजारपेठेत एकच हिंदु व्यापारी आहे, पण तो स्वतःला असुरक्षित समजत नाही.
कुसुमाग्रजांची कविता आहे...
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळले
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते...
ह्या ओळींचा खरा अर्थ कारगिलला समजतो.
इथं प्रगती व्हावी, व्यापार व्हावा, सुखशांती नांदावी असं पाकिस्तानला वाटत नाही. पण पाकव्याप्त काश्मीरमधले लोकसुद्धा पाकवर नाराज आहेत. गिलगिट, बलुचिस्तान, लेह, लडाख, कारगिल हा सगळा मिळून एकच भाग आहे आणि तो भारताचा आहे, असं कारगिलचे रहिवासी मानतात.
तोलोलिंग या ठिकाणी कारगिल विजय स्मारक आहे. एक छान संग्रहालय सैन्यानं जतन केलेलं आहेण बोफोर्स तोफा, इतर अनेक प्रकारच्या तोफा, बंदुका,
शस्त्रास्त्रे, तोफगोळे, युद्ध जिंकल्यानंतर पाकिस्तानकडून जप्त केलेल्या वस्तू असं बरंच काही ह्या स्मारकात आहे. आत प्रवेश केल्यानंतर दुतर्फा तिरंगे लहरत असतात. त्यामधून आपण आत जातो. शेवटी बरोबर मधे एक उत्तुंग ध्वज लहरत असतो. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं ताठ व्हावी असं हे स्मारक आहे.
याच वाटेवर टायगर हिल आहे. हे शिखर दुरूनही छान दिसतं. युद्ध जिंकल्यावर आपल्या सैन्यानं टायगर हिलवर जाऊन तिरंगा फडकावला होता. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा ह्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला हवी, असं वाटतं!


   

कश्मीर, कश्मीरीयत, कश्मीरी

श्री
कश्मीर, कश्मीरीयत, कश्मीरी


अनंतनाग जिल्ह्यात अनेक ठिकाणी बांगला देशात वैद्यकीय शिक्षण घ्या अशा मोठमोठ्या जाहिरातींचे अनेक फलक दिसले. एके
ठिकाणी स्वतंत्र काश्मीरची मागणी करणार्‍या एका नेत्याचे अभिनंदन करणारा फलक मोक्याच्या जागी लावलेला दिसला. तो काढण्याचा कुणी प्रयत्न केलेला दिसत नव्हता. आम्ही पहलगाममध्ये होतो तेव्हा अवंतीपुर्‍याजवळ चकमक झाली, दोन दहशतवादी आणि एक नागरिक ठार झाला. महामार्गावरील सगळे व्यवहार दहशतवाद्यांनी बंद केले.
श्रीनगरच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचे उपाध्यक्ष मोहम्मद सरताज मदनी यांची भेट झाली. मुख्यमंत्री मेहबूबा यांचे ते मामा. जे हिंदुस्थानवर नाराज आहेत, त्यांच्याशी बोला. लढाई, भांडण, दगडफेकीनं काही होणार नाही. पाकिस्ताननं सामना जिंकल्यावर जल्लोष का होतो? याचा विचार करा. म्हणजे, सरताज मदनी त्या गोष्टीचं समर्थन करतात की काय?
हिंदुस्थान, पाकिस्तान आणि हुर्रियत अशी एकत्र बैठक घेतली तर मार्ग निघेल. यातला पूल होण्याची मेहबूबाची, आमची सगळ्यांची  तयारी आहे. काश्मीर समस्येवर अटल बिहारी वाजपेयींनी काढलेला मार्ग चांगला होता. जमुरियत, काश्मिरीयत आणि इन्सानियत असं वाजपेयीजी म्हणाले होते. म्हणजे, लोकभावना, काश्मिरीपण आणि माणुसकी- हे जपायला हवं. पण तसं पुढं काहीच झालं नाही. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून त्यावरूच चालायला हवं. गिलानीसाहेब त्यांना का नाही भेटले? चर्चेची जरा कुठं सुरुवात झाली म्हटलं की, हल्ले झाले, असंच आतापर्यंत असं झालंय. कश्मीर- कश्मिरीयत आणि कश्मिरी यांचं अस्तित्व टिकलं पाहिजे, डेव्हलपमेंट इज नॉट इश्यू, पैसा भी इश्यू नहीं है. पॉलिटिक्स का मसला है. विकास तर पाहिजेच, पण स्वाभिमान त्याहून जास्त पाहिजे. हुर्रियत वालोंसे बात नहीं करोगे, नाराज लोगोंसे बात नहीं करोगे तब कुछ नही होगा.
ते दगड उचलतात, बंदूक उचलतात, आता तोफाही घेतील. चर्चेशिवाय प्रश्‍न सुटणार कसा? दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिंबा देतो, तर पैसा का नाही देणार? मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोलतात, पण काश्मीरचा विषय येत नाही. पंतप्रधानांनी मनात आणलं तर ते हुर्रियतशी बोलून प्रश्‍न सोडवू शकतात. कश्मीर हिंदुस्थान का दिल है; वो दिल दुखता है तो
हिंदुस्थानने कुछ करना चाहिये. प्रश्‍न तर खूप आहेत, कुठूनही सुरुवात करता येते. पाकिस्तान कश्मीर का दावेदार है मगर हम हिंदुस्थानी है. आम्हांला शांतता हवी आहे. सगळ्या धर्मांपेक्षा वरचा धर्म आहे माणुसकी! शेरबाग पहा. मध्ये मंदिर आहे, चारी बाजूला मशिदी आहेत. मंदिरातून पाणी वाहतं, ते सगळ्या मशिदींना पोहोचतं. असं काश्मीर आहे.
ङ्गद ग्रेटर कश्मीर हे तिथलं एक महत्त्वाचं वृत्तपत्र आहे. त्याचे संपादक आहेत फैय्याज अहमद कल्लू. ते एडिटर्स गिल्डचे चेअरमन आहेत.
ते इंग्लिशमधून निघतं. त्यांची इतर नियतकालिकं उर्दूमधून येतात. उर्दू ही काश्मीरची राज्यभाषा आहे. काश्मिरी ही बोली भाषा आहे; ती उर्दूपेक्षा वेगळी असली तरी लिहिली जाते उर्दू लिपीत. कल्लू यांच्याशी आम्ही चर्चा केली. दहशतवादी कारवायांमुळं वृत्तपत्र व्यवसायावरही दुष्परिणाम झालाय असं त्यांचं म्हणणं. काश्मीरची परिस्थिती बिघडली त्याला ते काँग्रेसला जबाबदार धरतात. काँग्रेसवाल्यांनी विश्‍वासघात केला असं त्यांचं म्हणणं आहे.  ङ्गअगर उस वख्त फारूख अब्दुल्लाह को काम करने दिया होता तो तो ये दिन नहीं होते.फ  समस्या नीट हाताळली नाही. अलीकडे तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्‍वासच उडालाय. दिल्लीला कुटुंबप्रमुख बसतात. पंतप्रधानांनी सरकारचे प्रमुख म्हणून काश्मीर प्रश्‍नाकडे पहायला हवं. त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. सर्वांना बरोबर घेऊन जाणं हे मोठ्यांचं कर्तव्य आहे. समस्या राजकीय आहे. हिंदुस्थान विरुद्ध काश्मीर असं चित्र आजवर निर्माण केलं गेलंय ते वास्तविक चुकीचं आहे. पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर जे फटाके उडवतात ते पाकिस्तानचे समर्थक नाहीत, ती भारताविरुद्धची प्रतिक्रिया आहे. पूर्वी लष्कर दहशतवाद्यांना समजावून सांगत होते, आता मारून टाकतं, असं कल्लू म्हणतात. अटल बिहारी वाजपेयींनी चांगली पावलं उचलली होती. त्यांनी माणुसकीचं आवाहन केलं होतं. ते पूर्ण करण्याची विनंती काश्मीरी करत आहेत. काश्मिरी प्रेमळ आहेत, त्यांच्याशी संवाद साधा. आम्हांला पीस विथ डिग्निटी हवी आहे. इथले हस्तकारागीर स्वावलंबी होते. हॉर्टिकल्चरचा व्यवसायही चांगला चालतो. आमचे अनेक लहान-मोठे व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. हम हिंदुस्थानी है. हमारा प्रधानमंत्री नवाज शरीफ नहीं है.
आणि सगळेजण म्हणतात तसे कल्लूही शेवटी म्हणालेच, टीव्हीवाल्यांनी आमचं काहीच दाखवू नये. त्यांच्या चुकीच्या बातम्यांनी तबाही मचा रख्खी है. त्यांना सांगा, आम्हांला शांततेनं जगू दे. वाहिन्यांनी काश्मिरी उद्योजकांना बदनाम केलं. त्यांच्यावर कुणीच काही नियंत्रण का नाही ठेवलं?
कल्लू आणि त्यांच्यासोबत आलेले रशीद मखदूम, हॉटेल व्यावसायिक मुश्ताक अहमद यांचा लष्करावर रोष दिसला. सैनिकांच्या पॅलेट बंदुकांनी लोकांचे डोळे गेले. सैनिकांनी सरहद्दीवर काम करावं. त्यांचं काम तिथं आहे. आत पोलिस असतातच. काश्मीरमध्ये बाहेर सैनिक, आत सैनिक! सैनिक इथं ट्रॅफिक पोलिसांचंही काम करतात. हे कितपत बरोपर आहे? सैनिकांनी सामान्य नागरिकांना आपल्या पुढं उभं करून ते दहशतवाद्यांना सामोरे गेले. म्हणजे मेले तर नागरिक मरावेत. असं पूर्वी अनेकदा व्हायचं. अंतर्गत सुरक्षिततेचं काम पोलिसांनी करावं; पण पोलिसांमध्ये जर शत्रू पाहिला, तर त्याच्याविषयीचा आदर राहणारच नाही.
हिमालयात पूर्वी नागवंशीय लोक रहात होते. नंतर बाकीचे लोक समजायला लागले की, नाग रहात होते. नग म्हणजे पर्वत नगावर राहतात ते नाग.
श्रीनगरमध्ये दल सरोवराच्या काठाशीच शेर- ए- काश्मीर कन्व्हेन्शन सेंटर आहे.  काश्मीरच्या सौंदर्यात भर घालणारे हे ठिकाण आहे.
तिथल्या स्वच्छतागृहातही गुलाबाच्या कुंड्या ठेवून ते सजवलेलं आहे. पर्यटन विभागाचे सचिव फारूख शाह यांनी पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांच्या संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह एक बैठक आयोजित केली होती. सुमारे पंचवीस व्यावसायिकांनी आपापली कैफियत मांडली.
काश्मीर खोर्‍यात इतर उद्योगांना काही वाव नाही. पर्यटन हाच एक प्रमुख व्यवसाय आहे. गांधीजींना काश्मीरमध्ये आशेचा किरण दिसला होता. काश्मिरींनी संकटग्रस्त यात्रिकांना आसरा दिला होता. गुलमर्गमध्ये मंदिराची देखभाल करतो तो मुस्लिम आहे. प्रत्यक्ष काश्मिरी जनतेच्या मनात हिंदु- मुसलमान असा भेद नाही. खरं तर काश्मीरला ब्रँड अँबेसिडर नेमावा अशी चर्चा होते. पण काश्मीर स्वतःच एक ब्रँड आहे, दुसरा नेमण्याची आवश्यकताच नाही. स्वित्झर्लंडपेक्षा काश्मीर सुंदर आणि स्वस्त आहे. पण  केंद्र सरकारनं 

...म्हणून हातात बंदुका आल्या!

श्री
काश्मीरची साद- 3
श्रीराम ग. पचिंद्रे
--------------
...म्हणून हातात बंदुका आल्या!

आपल्या गावचा माणूस जगाच्या पाठीवर कुठंही भेटला, तर कुणालाही आनंद होतो; तसाच मला झाला, श्रीधर पाटील यांना भेटल्यावर. श्रीधर पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातल्या तुरुकवाडीचे. सध्या ते कुलगाम ह्या दहशतवादी मानल्या गेलेल्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आहेत. कुल शब्दाचा अर्थ झरा. अनेक छोट्या छोट्या झर्‍यांचा जिल्हा म्हणजे कुलगाम. 2010 मध्ये भारतीय पोलिस सेवा उत्तीर्ण झाले आणि 2011 पासून काश्मिर खोर्‍यात आहेत. बुरहान वणीला मारलं, तेव्हा ते अवंतीपूरचे जिल्हा पोलिस प्रमुख होते. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी सारे अधिकारी जमायचे होते. त्यांना जायचं होतं. आमच्यासाठी ते अनंतनाग पोलिस मुख्यालयात आले होते.
पाटलांच्या म्हणण्यानुसार अनंतनाग, कुलगाम हा सगळा जंगलाचा भाग आहे. शहरापासून दूर आहे. ऑर्किड्स, अक्रोड, सफरचंदाचे मळे पिकवणारे जमीनदार कुलगामात आहेत. वर्षाकाठी एकेका घरात 25- 30 लाख रुपये येतात. पण सगळ्या जिल्ह्यात मिळून महाविद्यालय मात्र एकच आहे. ह्या परिसरात हिंसाचाराला सामाजिक पाठिंबा आहे. तरुणांना हिंसाचार करणं म्हणजे हिरॉईक वाटतं. 20 ते 25 वयोगटातील तरुणांना आपली ऊर्जा बाहेर काढायला काहीच प्रेरणा नाही. आपल्याकडे कसं तरुणांसमोर क्रिकेटवीर, चित्रपटातले तारे, आयएएस - आयपीएस अधिकारी अशी प्रेरणास्थानं असतात. तशी दहशतवादी ही इथली प्रेरणास्थानं आहेत. दंगलींचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. दहशतवादी तरुण पोलिस प्रमुखालाच सांगतो की, काश्मीर स्वतंत्र झालेलाच आहे, तुम्हांला माहीत नाही, दिल्लीत बोलणी चालू आहेत. मसुद्यावर शेवटचा हात फिरवायचं काम चाललंय. इथल्या दहशतवादाला गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी आहे. परवा मारला गेलेला दहशतवादी शाहजार अमली पदार्थांच्या व्यवहारातला होता. बुरहान प्रकरण वेगळं, तो तर हिजबुलचाच होता. दहशतवादी काम करा, शहीद व्हा, तुमच्या अंत्ययात्रेला दहा हजार लोक जमतील, तुम्ही हीरो व्हाल, असं तरुणांवर बिंबवलं जातं. इथली कायद्याची चौकट एवढी ढिली झालेली आहे की, खुनी आणि स्मगलरसुद्धा 15 दिवसात जामीनावर सुटून समाजात येतो. भ्रष्टाचार खूप आहे. विकासकामं होत नाहीत. मूलभूत सुविधाही लोकांना मिळत नाहीत.
श्रीधर पाटील यांचा निरोप घेऊन पहलगामच्या दिशेनं चाललो. वाटेत लागणार्‍या अवंतीपुरातील त्राल गावात क्रिकेटच्या बॅटी तयार करण्याचे कारखाने या परिसरात आहेत. बुरहान वणी त्राल गावचा रहिवासी होता. ङ्गसरहदफ संस्थेनं या भागातील तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र केलं होतं. तरुणांनी दहशतवादाकडे वळू नये म्हणून विधायक मार्गाकडे नेण्याचा हा प्रयत्न होता. श्रीधर पाटील यांनीही पुढाकार घेतला होता. मुनीर हा तरुण उत्तम क्रिकेट खेळायचा. त्याच्या नेतृत्वाखाली चांगला संघ तयार झाला होता. पण असे उपाय दीर्घकालीन असतात. त्याला सातत्य लागतं. दुर्दैवानं त्यात सातत्य ठेवता आलं नाही, त्यामुळं तिथून मुनीरसारखा क्रिकेटवीर बाहेर न पडता, बुरहानसारखे दहशतवादी निर्माण झाले, प्रेरणा चुकीच्या असल्यामुळं हातात बंदुका आल्या, दगड आले.
पहलगाम हे काश्मिरातलं सर्वांगसुंदर गाव. काश्मिरी लोकांचं स्वास्थ्य विघडायला महाभारत काळापासून आरंभ झाला. श्रीकृष्ण फिरत फिरत काश्मीरपर्यंत गेला होता. गोनंद नावाचा राजा त्यावेळी काश्मिरात होता. त्याची राणी यशोमती. गोनंदानं श्रीकृष्णावर हल्ला केला. हा यादव घराण्यावरचा हल्ला असल्यानं बलरामानं गोनंदाला मारलं, अशी कहाणी नीलमत पुराणात सांगितलेली आहे. राजतरंगिणी हा कल्हणानं लिहिलेला काश्मिरचा काव्यात्म राजकीय इतिहास आहे, तर नीलमत पुराण हा काश्मिरचा सांस्कृतिक इतिहास आहे. ब्रिटिशांनी दहा वर्षं काम करून ह्या ग्रंथांचा तौलनिक अभ्यास केला. आपल्याकडे मात्र त्यावर काम झालं नाही.
पहलगामचा रस्ता विलक्षण सुंदर आहे. दुतर्फा अक्रोड- सफरचंदाची झाडं आहेत. सध्याच्या दिवसातील सफरचंदाची भाजी चांगली होते म्हणे.
पहलगाममधल्या पर्यटनाशी संबंधित संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा आयोजित केली होती. त्यात घोडेवाल्यांची संघटनाही होती.
1996मध्ये महापूर आला होता. त्यात 50 हजार अमरनाथ यात्रिक अडकले होते. त्यांना पहलगामच्या रहिवाशांनी आपल्या घरात पैसे न घेता आसरा दिला होता. ते यात्रेत मोफत आरोग्य शिबिर चालवतात. ते स्वतःला धार्मिक समजतात, धर्मवादी नव्हे! बेरोजगारीचं प्रमाण एवढं आहे की पदव्युत्तर तरुण
पर्यटकांना घोड्यावरून ने- आण करण्याचं काम करतात. चाळीस टक्के पदव्युत्तर पदवीधर, चाळीस टक्के पदवीधर, दहा टक्के दहावी शिकलेले, पाच टक्के दहावीपेक्षा कमी आणि पाच टक्के अजिबात न शिकलेले तरुण घोड्यांच्या व्यवसायावर आपली गुजराण करतात. पहलगाम संपूर्ण पर्यटनावर अवलंबून आहे.
पर्यटकांना आणि लष्कराच्या जवानांना अपघात झाला, ते रक्तबंबाळ झाले, तर त्यांना माणुसकीच्या नात्यानं रहिवाशांनी रक्तदान करून वाचवल्याची उदाहरणं आहेत.
त्यातील काही (मुसलमान) व्यावसायिकांचं म्हणणं असं, ङ्ग हम शिवजी के चरणों में रहते है. हम अमरनाथ यात्रिओंको कंधे पर उठाकर ले जाते हैं, उनको मदद करते हैं. उनका रक्षण करते हैं. शिवजी हमें आशीर्वादही देते है. इसलिए तकफीफ बहोत होती है फिर भी हम हिंमत नहीं हारते, खुदकुशी नहीं करते...हमें रियासतमे मजबूत रहना है. फ
गुलमर्ग, सोनमर्गमधल्या काही ठराविक लोकांकडे सफरचंद, अक्रोडाच्या बागा आहेत. तेवढेच श्रीमंत आहेत. उरलेल्या गरीब लोकांच्याजवळ भाताचीही शेती नाही. आम्ही म्हणजे दगड फेकणारे अशीच प्रतिमा निर्माण केलेली आहे. गोव्यातला एक तरुण इथं कामाला होता. तो सुट्टीवर गेला होता, त्याचे पालक त्याला मह्णाले की, जाऊ नको परत काश्मीरला. नाहीतर तूही दगड फेकणारा होशील. अशी आमची बाहेरच्या जगात प्रतिमा! विकासाची कामं होत नाहीत, रोजगार नाही.  एक वर्षं आमची एक पैसा मिळकत नाही. आम्ही जगायचं कसं? प्रसारमाध्यमं नकारात्मक गोष्टी जास्त दाखवतात. टी. व्ही. वाल्यांनी आपलं काश्मीरबद्दलचं प्रसारण बंदच केलं तर बरं होईल. पर्यटक येतील आणि आमचे निम्म्याहून अधिक प्रश्‍न सुटतील, त्यांनी काहीच दाखवू नये, असं पहलगामवासीयांचं म्हणणं आहे.
पहलगाममधल्या हिंदु- मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मामलेश्‍वर शिवमंदिर दाखवलं जातं. हे मंदिर 5 व्या शतकात राजा जयसिंहानं बांधलं. मामलेश्राचा पुजारी मुसलमान आहे. गुलाम हसन हे त्याचं नाव. तो मंदिराची देखवाल आणि पूजाअर्चा करतो. अत्यंत स्वच्छ, नितळ पाण्यानं भरून वाहणार्‍या लिड्डर नदीच्या उजव्या तीरावर हे लहानसं मंदिर आहे. समोर कुंड आहे, त्यात नदीचं पाणी येतं. ते अर्थातच अतिशय शुद्ध आणि शीतल आहे. सर्वत्र पाईन आणि चिनारची झाडे आहेत. अक्रोड आणि बदामपेक्षाही पाईन वृक्षाचे दाणे चवदार असतात आणि तीन हजार रुपये किलोनं ते विकले जातात अशी माहिती मिळाली. काश्मिरात आम्हांला कुठंच म्हशी दिसल्या नाहीत, फक्त गाई आणि बकरी. भिकारी दिले नाहीत. फक्त एक भिकारीण दिसली, ती मट्टंड मधल्या प्राचीन सूर्यमंदिराच्या बाहेर. श्रीनगर- पहलगामच्या रस्त्यावरच आतल्या बाजूला वळणावळणाचा चढतीचा रस्ता आहे. तो चढून गेल्यावर प्राचीन सूर्य मंदिर आहे. त्याच्या अलीकडं त्याच्या मानानं आधुनिक काळातलं सूर्यमंदिर आहे. तिथं सूर्याची रथात बसलेली मूर्ती आहे. विशाल कुंड समोर आहे. त्यात लक्षावधी मासे आहेत. त्या माशांना तिथं संरक्षित केलेलं आहे. माशांना खायला घालायची भाविकांना मुभा आहे. ते खाद्य तिथं विकत मिळतं. मूळ सूर्य मंदिराकडे आम्ही गेलो. एका विशाल मंदिराची ती भग्नावस्था पाहून मन विषण्ण झालं. अनंतनाग जिल्ह्यातलं हे मंदिर मट्टंड गावात आहे. मंदिराचं नाव सूर्य मार्तंड मंदिर आहे. मार्तंड नावाचा अपभ्रंश होऊन त्याचं मट्टंड झालं. सन 370 मध्ये मार्तंड सूर्यमंदिराचा पाया घातला गेला. पण पुढे दीर्घकाळ मंदिराचं काम रेंगाळलं असावं. कारण त्यानंतर अनेक वर्षांनी कर्कोटक राजघराण्याचा तिसरा अधिपती ललितादित्य मुक्तापीड यानं सन 721 ते
761 ह्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण केलं. काश्मिरच्या समृद्ध वास्तुवैभवातला शिरपेच म्हणजे हे अद्वितीय सूर्यमंदिर होय. आज मंदिराचे अवशेष पाहिले, तरी एके काळच्या त्याच्या भव्यतेची, वैभवाची आणि सौदर्याची कल्पना येते. मंदिराचा आकार 222 फूट लांब आणि 142 फूट रुंद आहे. त्याच्या बाहेरचा प्राकार त्याहून भव्य आहे. त्याच्या काळ्या पाषाणातील भक्कम भिंती पाहून मंडप किती भव्य असेल याचा अंदाज येतो. अनेक भक्कम खांबांनी हे मंदिर तेव्हा तोलून धरलेलं होतं. भिंतींवर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. ललितादित्यानं गांधार, गुप्त, चिनी, रोमन सीरियन, ग्रीक अशा विविध स्थापत्यशैलींचा अभ्यास करून मंदिराची उभारणी केली होती. मंदिराच्या गाभार्‍यात सूर्यदेवाची मूर्ती होती. आता तिथं काहीच नाही. ह्या अत्यंत सुंदर आणि भव्य मंदिराचा विनाश 15 व्या शतकाच्या आरंभी मुस्लिम राजा सिकंदर बुतशिकन यानं केला. हे मंदिर पुरतं उद्ध्वस्त करीपर्यंत त्याला समाधान लाभलं नाही. आजही त्या मंदिराचे भग्नावशेष त्याच्या विशाल सौंदर्याची साक्ष देतात, हे खरं!
(क्रमशः)



माझा हिंदुस्थान!

श्री
काश्मीरची साद -2
श्रीराम ग. पचिंद्रे
-------------
माझा हिंदुस्थान!
-----------

माझा हिंदुस्थान,
माझा माझा हिंदुस्थान
हिमालयाचे हीरकमंडित शिरभूषण भरदार
वक्षावर गंगा- यमुनांचे रुळती मौक्तिकहार...
...ही कुसुमाग्रजांची गाजलेली कविता  आहे. हिमालय हा देशाचा मुकुट आहे. पण, हिंदुस्थानचं जणू हिर्‍यानं मढवलेलं तेजस्वी शिरभूषण डौलानं वागवणारा काश्मीर स्वतः मात्र जळतो आहे. काश्मीर समजून घेणं हे खरंच गुंतागुंतीचं आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळी मतं, वेगवेगळे निष्कर्ष...हवालदिल जनता, अस्वस्थ राज्यकर्ते. मात्र तिथले सर्वसामान्य नागरिक, राजकारणी, व्यापारी, उद्योजक सर्वांचीच ङ्गमाझा हिंदुस्थान, माझा माझा हिंदुस्थान...फ  हीच भावना आहे. आम्हांला भेटलेला एकही माणूस काश्मीरचं स्वातंत्र्य मागत नव्हता किंवा पाकिस्तानात जायचंय असंही म्हणत नव्हता. प्रत्येकजण हिंदुस्थान हाच शब्द वापरत होता. आम्हांला हिंदुस्थानात रहायचंय. आम्हांला देशवासीयांनी आपलं म्हणावं. असेच सारेजण बोलत होते.
मोहम्मद युसूफ तारिगामी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) आमदार आहेत. अनंतनाग महाविद्यालयात विद्यार्थी  असल्यापासून ते डाव्या चळवळीत काम करीत आहेत. ते सध्या पक्षाचे राज्य सचिव आहेत.  ते 1996, 2002, 2008 आणि 2014 अशा चार खेपेला निवडून आले. दक्षीण काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कुलगाम जिल्हयातील  तारिगाम- देवसार गावात तारिगामी यांचं वडिलोपार्जित निवासस्थान आहे, त्यावर 18 मे दिवशी रात्री 9 वाजता दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. त्याच वेळी ते श्रीनगरला होते. त्यामुळं गोळीबारात कोणाला इजा झाली नाही. त्यांची भेट झाली.
देशातल्या अनेक नेत्यांना काश्मीर प्रश्‍न समजला नाही, त्यामुळं इथला संघर्ष चिघळत राहिला, ते म्हणतात, महाराजा हरिसिंह हे डोगरी राजा होते. त्यांना काश्मीर हे स्वतंत्र राज्य हवं होतं. ज्यावेळी गांधीजींनी भारत छोडो चळवळ केली, त्यावेळी शेख अब्दुल्ला यांंनी काश्मीर छोडो चळवळ केली. त्यांनी हरिसिंह यांना सिंहासन सोडायला सांगितलं. त्यांंना काश्मीरमध्ये लोकशाही यावी असं वाटत होतं. ही चळवळ हिंदु राजा विरुद्ध मुस्लिम नेते अशी नव्हती, तर प्रजा विरुद्ध राजा अशी होती. काश्मीर हा हिंदुस्थानचा - हिंदुस्थानच्या लोकशाहीचा भाग असायला पाहिजे, अशी चळवळीची मागणी होती. पण पाकिस्तानला हे नको होतं. आम्हांला धर्मनिरपेक्ष भारत हवा आहे. काश्मिरी पंडित आज संख्येनं कमी राहिलेले आहेत. ते भयमुक्त व्हायला हवेत. आज अनेक माध्यमं काश्मीरचं चुकीचं प्रसारण करतात. तारिगामी यांचा रोख दृक्-श्राव्य माध्यमांकडे होता. ते म्हणतात की, आपण 15 ऑगस्टला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटलो. पंतप्रधान दीड तासात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय विषयावर बोलले; चांगलं बोलले, पण काश्मीरविषयी एक शब्दही बोलले नाहीत. 
काश्मिरात लष्कर आणि केंद्रीय राखीव जवानांवर होणारा दगडांचा मारा ही आता रोजची बाब झालेली आहे. तारिगामी म्हणतात, दहा नाही, शंभर नाही, हजारोंच्या संख्येनं लोक जवानांवर मारा दगडफेक करतात. लष्कराजवळ शस्त्रं -गोळ्या आहेत, दारूगोळा आहे, हे माहीत असूनही ते दगड फेकतात. का? ती सरकारविरुद्धची प्रतिक्रिया आहे; स्थानिक सरकार नव्हे. काश्मीर सुंदर आहे म्हणून पर्यटक येतात, तेव्हा त्यांना इथल्या मुलांच्या डोळ्यात क्रोध अणि हातात दगड दिसावेत, असं मला वाटत नाही. पण मुलं संतापली तर बापाला बाप मानत नाहीत. आपल्यावर अन्याय होतोय अशी त्या लोकांची भावना आहे. आज त्यांच्यात हा संताप आहे. ही परिस्थिती आता लष्कर किंवा राखीव दल सांभाळू शकणार नाहीत. ही समस्या 1947 पासून सुरू झालीय. हा दगडफेकीचा प्रश्‍न नाही, राजकीय परिस्थितीचा आहे. काश्मीरचं दुःख देशात सर्वत्र पोहोचलं पाहिजे.
गेल्या वर्षी बुरहान वणी ह्या दहशतवाद्याला चकमकीत मारलं, त्याचा संदर्भ आला. त्याच्या अंत्ययात्रेला हजारो लोक आले होते. दक्षिण काश्मीरमध्ये तीन दहशतवादी मारले गेले, त्यांच्या अंत्ययोला सुमारे 15 हजार लोक जमले होते. तेवढे लोक शेख अब्दुल्ला यांच्या अंत्ययात्रेलाही नव्हते. याचा विचार केला पाहिजे. कोणी बंदूक उचलली, तर लष्कर त्याच्याशी बंदुकीच्याच भाषेत बोलणार. दहशतवादी हे प्रायोजित (स्पॉन्सर्स) आहेत, अशी चर्चा आहे. तारिगामी म्हणतात, मरणारे सगळेच स्पॉन्सर्स नसतात. दगड फेकणार्‍या मुलांना शत्रू मानू नका. काश्मीरमधून लष्कर हटवलं तर प्रश्‍न सुटेल का? तर तारिगामी म्हणतात की, नाही, लष्कर नको हटवायला, पण सिक्युरिटी स्ट्रक्चरपासून मुक्ती हवी. मनमोहन सिंग यांनी वर्किंग ग्रुप बनवले होते. त्यांचा उपयोग होत होता. हैदराबादचे संघाचे नेते राजाभैय्या ठाकूर जे बोलले ते विषारी आहे की नाही? काश्मिरी मुसलमान विक्रेत्यांकडून काहीही विकत घेऊ नका, आपण फेकलेल्या तुकड्यावर काश्मिरी मुसलमान जगतात, असं हा माणूस म्हणतो. ही भाषा पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. दहशतवाद्यांच्या हातून जवान मरतात, ती माझी मुलं मरतात अशी भावना आहे माझी. हिंसाचारानं  काही होतं नाही. राजकीय पातळीवर चर्चा झाली पाहिजे. सरकार विरुद्ध काश्मीर हे मी समजू शकतो, पण देश विरुद्ध काश्मीर हे नाही समजू शकत. माझी चिंता प्रवृत्तींविषयी आहे. आम्ही भारतीय आहोत. पाकिस्तान आमचा शत्रू आहे, हे सर्व देशानं समजून घ्यावं.
ङ्गङ्गमेहबूबा की सरकार पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी- पीडीपी कि है. वो लोग भाजपा को धर्मवादी कहते थे. अब उनके साथ सरकार बनायी है. मेहबूबा कहती है कि, वो हुर्रियत लीडरसे बात करेगी. लेकिन मेहबूबा इज मेहबूबा. प्रॉब्लेम्स उसके कद से बडे है...फ
सगळ्या देशात राजकारणात धर्म आला. काश्मीरमधेही तेच झालंय, तारिगामी यांच्यातला भाकप नेता बोलत होता. स्थानिक नेतृत्वाला फारसे अधिकारच नाहीत. मी एक छोटीशी भूमिका निभावतो आहे. माझं म्हणणं असं की, आपण सर्वपक्षीय नेते मिळून पंतप्रधानांना भेटू या. विनंती करू या. चर्चा करायलाही हृदय विशाल असायला हवं. बात करना मतलब पाकिस्तान कि बातम मानना नहीं.
काश्मीरमधले सगळे नेते हेच म्हणतात़ ...चर्चेने प्रश्‍न सुटेल. पण ही चर्चा कुणी, कुणाकुणाशी, कशी आणि कधी करायची? याचं उत्तर मिळत नाही.
काश्मिरी हिंदु- मुसलमान जनतेला भारत हा आपला देश हवा आहे. फुटिरतावाद्यांविषयी सर्वसामान्य जनतेला आस्था नाही.
तारिगामी यांच्यासह अनेक नेत्यांच्या बोलण्यात एक नाव मोठ्या आदरानं येत होतं, ते म्हणजे माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं!
एक उद्योगपती उमर त्रंबू यांनीही त्यांचं नाव घेतलं. काश्मिरमध्ये उद्योग तसे कमीच. त्यातलाच एक 130 वर्षांचा खैबर सिमेंट हा त्रंबू यांचा दोनशे कोटींचा व्यवसाय आहे. त्यांची हॉटेल शेरेटनमध्येही भागीदारी आहे. पण सध्या दोन्ही उद्योगांत मंदी आहे. हॉटेलवर अवलंबून असलेले लाँड्री, भाजीपाला पुरवठा असले व्यवसायही पर्यटकांच्या अभावी बंद पडायला लागलेत. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यात कुणाला शंका नाही. भारत सरकार हेच आमचं सरकार, पाकिस्तानचं नव्हे,  त्रंबू म्हणतात. वाजपेयींच्या काळात चर्चा होत होती. जगात अशी समस्या नाही की, जी सुटत नाही. वाजपेयींनी बरोबर ङ्गरोड मॅप म दिला होता. सरकार समस्या सोडवण्यासाठीच असतं. काश्मीरची समस्या आजही चर्चेनं सुटू शकते. तसा प्रयत्न व्हायला हवा.
काश्मीरी माणूस किती आतिथ्यशील आहे, त्याला पाहुण्यांविषयी आस्था असते. त्रंबू म्हणतात, काश्मिरी माणसाची आत्मीयता वैष्णोदेवीच्या यात्रिकांना विचारा.
पुरात अडकलेल्या यात्रिकांचं रक्षण करून त्यांना आश्रयही आपल्या घरात दिला होता.  कश्मीर तो बहुत पुराना सिल्क रूट है. इस रूट ने इतिहासमें लाखो लोगों को फायदा दिया है...श्मिीरमध्ये मोठी क्षमता आहे. विजेच्या क्षेत्रात आपण चांगलं काम करीत आहोत. उत्तर भारताला विजेचा पुरवठा करतो. पण काश्मिरात दहशतवाद्यांच्यामुळं बर्‍याच वाईट गोष्टी घडताहेत. अमली पदार्थांचं व्यसन वाढलंय. आरोग्य सुविधा नाहीत. नेटवर्क सतत बंद असतं. दहशतवाद्यांनी शाळा जाळल्या...किती वाईट गोष्ट! आमच्याकडे डॉक्टर्स - इंजिनिअर्स पडून आहेत. त्यांची दुसर्‍या राज्यात जाऊन काम करायची तयारी आहे. माझं मुंबईत नेहमी येणं-जाणं असतं. महाराष्ट्रीय लोक दिलदार आहेत.
काश्मीर हे असं राज्य आहे की, सतत काही ना काही घडत असतं. वृत्तवाहिन्यांची एकमेकांत स्पर्धा असते. काश्मीरमध्ये जे घडतं, ते किती वाईट आहे, हे सांगण्याची अहमहमिकाच त्यांच्यात लागते. त्याचा आमच्या जनजीवनावर परिणाम होतो. ह्या बातम्या बघून आम्ही काळजीत पडतो. जिथं ती दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात असतं, तिथल्या नातलगांना विचारलं, तर ते सांगतात की, काही किरकोळ घडलंय. जगात मात्र पसरतं की, काहीतरी भयंकरच घडलंय! मुद्रित माध्यमांचं काम चांगलं चाललंय. त्यांवर आमचा विश्‍वास आहे.
आपल्या शेजार्‍याइतका वाईट शेजारी जगात दुसर्‍या कुठल्याच देशाचा नसेल ही बहुतेक काश्मिरींची भावना आहे, तीच त्रंबू यांनी व्यक्त केली. दहशतवाद हा पाकिस्तान प्रायोजित आहे. आम्हंला शांतता हवी आहे. कोई नहीं चाहता कि मुसीबत हो. कुणाशी चर्चा करायची हे सरकारला माहीत आहे. पाकिस्तानने क्रिकेटचा सामना जिंकल्यावर फटाके कोण उडवतं? वो नादान बच्चे है. ही छोटी गोष्ट आहे. मूळ प्रश्‍न सोडवा. बाकीचे आपोआप सुटतील. आर्मी को छेडो मत, उनका एक रोल है. लेकिन बातचीत में आर्मी नहीं होनी चाहिए.  तुम्ही महाराष्ट्रात जाऊन सांगा की, हिंदुस्थान आमचाही आहे!

काश्मीरची साद

श्री
काश्मीरची साद
-------------
श्रीराम ग. पचिंद्रे
--------------
काश्मिरला हवीय शांतता
---------------------
अगर फिरदौस बरोय जमीं अस्त
हमीं अस्त हमीं अस्त हमीं अस्त
(ह्या पृथ्वीवर स्वर्ग जर कुठं असेल, तर तो हाच आहे, हाच आहे, हाच आहे) असं काश्मीरचं वर्णन मुगल बादशहा जहांगीर यानं केलेलं आहे.
काश्मीर हा स्वर्ग आहेच. जहांगिराच्या काळात तर तो निश्‍चितच नंदनवन म्हणावा असा असेल. त्यावेळी पाकिस्तान नव्हता, अखंड भारत होता,
दहशतवादाची आग नव्हती, अशांतता नव्हती, लोक सुरक्षित होते. आणि आज?...आजही काश्मीर हा स्वर्ग आहे, पण...काश्मीरविषयीची सारी पुस्तकं
विचारात घेतली, तर त्यांची शीर्षकं काय आहे? चिनारच्या ज्वाळा, अस्वस्थ नंदनवन, शापित नंदनवन, धुमसते काश्मिर इत्यादी...बहुतेक सगळ्या पुस्तकांचा एकच सूर आहे, तो म्हणजे काश्मीर अस्वस्थ आहे, अशांत आहे, धुमसत आहे...मग असं का आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपापल्या परीनं सगळे विचारवंत करताना दिसतात. पण खरोखरच काश्मीर धुमसत आहे का? असुरक्षित आहे का? सरहद ही पुणेस्थित संस्था गेली अनेक वर्षं काश्मीर आणि महाराष्ट्र यांच्यात सेतू बांधायचं महत्कार्य करीत आहे. ज्यांच्या पालकांना दहशतवाद्यांनी मारलं, जी उघड्यावर पडली अशा काश्मीरमधील अनाथ मुलांना  संजय नहार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुण्यात आणलं, गेली चौदा वर्षं ते त्यांना शिक्षण देत आहेत. जाहिद भट हा तरुण तिथंच शिकून मोठा झाला, तो काश्मिरी भाषेइतकीच सफाईदार मराठी भाषा बोलतो. त्याचा संसार महाराष्ट्रातच बहरला. एका कुटुंबातील पंधरा माणसं दहशतवाद्यांनी एका रात्रीत गोळ्या घालून मारली. त्या हल्ल्यात पाच जण कसेबसे वाचले, पण गंभीर जखमी झाले. घरातल्या लहानगीनं आपल्या पाच वर्षाच्या भावाला मागच्या खिडकीतून बाहेर फेकलं. तो वाचला. हाच जोगिंदर नुकताच पुण्यात पदवीधर झाला. 2002 पासून संजय नहार महाराष्ट्रातल्या पत्रकारांना काश्मिरचा दौरा घडवत आहेत. नुकताच ज्येष्ठ पत्रकारांचा अभ्यासदौरा जम्मू- काश्मीर पर्यटन विकास महामंडळानं सरहद संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला होता, जाताना मला अनेक हितचिंतकांनी सांभाळून जायला अन् जपून राहायला सांगितलं. तिथं दररोज काही ना काही घडतंच, लोक बळी पडतात. जवान बळी पडतात. सगळं अनर्थावह घडतंय. त्यामुळं काश्मिरला जायचं तर जीव मुठीत घेऊन, अशीच सर्वसामान्यांची समजूत आहे. श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्यापासून वास्तव्याच्या ठिकाणी जाईपर्यंत वाटेत दुतर्फा पॉप्लर, पाईन, सफरचंदाची झाडे लक्ष वेधून घेत होती. काश्मिरचा प्रख्यात असलेला वृक्ष म्हणजे चिनार. चिनार सगळीकडेच होता.
मधमधे डाळिंबाची, अक्रोडाचीही झाडं दिसत होती. चिनार हा मूळ काश्मिरी वृक्ष नव्हे. तो पर्शियन वृक्ष. मुगलपूर्व काळात तो काश्मिरात आला. असं म्हणतात की, बुद्ध धम्माचे अनुयायी काश्मिरात आले तेव्हा त्या भूमीत पिंपळ कुठंच आढळला नाही, म्हणून त्यांनी पिंपळाऐवजी साधनेसाठी चिनारच्या वृक्षाचा स्वीकार केला. काश्मीरचा प्राचीन इतिहास पाहिला, तर तिथं शैव पंथाचं आणि वैदिकांचंही वर्चस्व होतं. नंतर बौद्ध आले आणि नंतर मुस्लिम आले.
प्राचीन काळात इथं शैव तत्त्वज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. अभिनव गुप्त हा महान पंडित शैव पंथाचा होता. त्यानं अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे.
अभिनव गुप्त याचे वारस स्वामी लक्ष्मण जू रैना यांचा आश्रम श्रीनगरमध्ये आहे. संपूर्ण काश्मिरात आता पंडितांची संख्या फार तर तीन हजार असेल. 1999 नंतर बहुसंख्य राज्य सोडून गेले. दाल सरोवरात पहिली हाऊसबोट स्वामींनीच शंभर वर्षापूर्वी आणली. ते अंतर्ज्ञानी होते. चिारच्या झाडाखाली बसून ते शिष्यांना शैव तत्त्वज्ञान शिकवायचे. ईश्‍वर आश्रम ट्रस्टचा हा आश्रम आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्याआधी जेव्हा त्या काश्मिरला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी आश्रमाला भेट दिली होती. स्वामी लक्ष्मण जू यांनी चिनारच्या वृक्षाखाली बसवून त्यांना बसवून पांढरी शाल पांघरली होती. पांढरी शाल पांघरून तुझा अंतकाळ जवळ आला आहे, हे त्यांनी सूचित केलं होतं, असं स्वामींचे सध्याचे वारसदार, त्यांच्या भावाचे पुत्र एल. जी. रैना यांनी सांगितले. ही गोष्ट खरी की खोटी हे आता कसं ठरवायचं? पण रैना तसं म्हणाले खरे.पांढरी शाल हे मृत्यूचं प्रतीक असतं म्हणे.
आज काश्मिरात जी अस्वस्थता आहे, ती नेमकी कशाची आहे याचा शोध घेतला, तर असं लक्षात आलं की, ती अनेक प्रकारची, गुंतागुंतीची अस्वस्थता आहे.
तिथल्या प्रश्‍नाला अनेक कोन आहेत, बाजू आहेत. सैनिकांवर, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर दगड फेकणं हा काही तरुणांचा रोजगार झालेला आहे. विघटनवादी शक्ती नवतरुणांना आणि मुलांना दररोज संध्याकाळी साडेपाच ते सहा सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी पैसे देतात; जर पैसे मिळाले नाहीत, तर हे तरुण दगडफेक करत नाहीत.
आम्ही गेलो ते रॉयल स्प्रिंग गोल्फ कोर्सच्या परिसरात. दाल सरोवराच्या समोरच ते आहे. तिथं एक उद्योजक भेटले. त्यांचं नाव अमित वांच्छू. ते काश्मिरी पंडित आहेत.त्यांचा औषध निर्मितीचा उद्योग आहे, शिवाय त्यांचा एक वाद्यवृंदही आहे. त्यांचं म्हणणं असं की, सैनिकांवर दगड फेकणं हा काश्मिरात एक व्यवसाय बनलाय. तिथं सतत अस्वस्थता ठेवणं हाच एक उद्योग निर्माण झालाय. एका घरात सर्व पक्षाचे लो क राहतात. आई पीडीपीची, बाप नॅशनल कान्फरन्सचा, भाऊ दहशतवादी विघटनवाद्यांच्या बाजूनं, स्वतः काँग्रेसकडून, काका राष्ट्रवादी काँग्रेसचा. जिकडून पैसा मिळेल, त्यांच्या बाजूनं रहायचं. आपापल्या सोयीनुसार कधी जय हिंदुस्थान तर कधी जय पाकिस्तान म्हणायचं. लोक सतत भयभीत राहिले पाहिजेत असं फुटीरतावाद्यांना वाटतं. पण काश्मीर खोर्‍यात उद्योग उभे रहायला पाहिजेत, रोजगार वाढला पाहिजे इकडे कुणाचंच लक्ष नाही. बाहेरच्या लोकांना इथं जमीन विकत घेता येत नाही, ही गोष्ट खरी, पण 99 वर्षाच्या भाडेपट्टीनं जागा मिळतात, सरकारनं त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे.
पहिल्यांदा दारिद्ˆय दूर झालं पाहिजे. मग बाकीच्या समस्या सुटतील.
पर्यटन संचालक महमूद शाह यांनी तिथं भेट दिली. ते असं म्हणतात की, अशांतता आहे, अस्वस्थता आहे हे खरे. पण जे आहे त्यापेक्षा जास्त बाहेर दाखवलं जातं. बाहेर म्हणजे, देशभर. ग़ोळीबार झाला, होत असतो सारखा, पण तो पुलवामा भागात. वाहिन्यांच्या बातम्यांतून पसरवलं जातं ते श्रीनगरात गोळीबार झाला, दहशतवादी हल्ला झाला असं. श्रीनगर ही राजधानी असल्यामुळं काश्मीरची बातमी आली की, श्रीनगरचं नाव येतं. पोलिस शहीद झाले, जवान शहीद झाले, ही गोष्ट खरी. पण पर्यटकांनी भ्यायचं काहीच कारण नाही. आजपर्यंत एकही पर्यटक दहशतवादी हल्ल्यात दगावलेला नाही किंवा जखमीही झालेला नाही.  काश्मिरात 22 जिल्हे आहेत, पण फक्त कुलगाम, पुलवामा आणि शुफियां ह्या तीन जिल्हयातच अशांतता आहे. आमचं अर्थकारण पर्यटनावर आधारलेलं आहे. पर्यटकांना त्रास देणं हे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे, हे सर्व काश्मिरींना माहीत आहे. इथं समस्या आहेत, पण त्याहून जास्त  ङ्ग खौफ फ  बाहेरच्या जगात पसरवला जातो. आम्हांला याच गोष्टीची चीड आहे. इथल्या प्रत्येकाला पाहुण्यांबद्दल जिव्हाळा असतो.
तिथून आम्ही प्रसिद्ध लाल चौकात आलो. शेर -ए- काश्मीर शेख अब्दुल्ला यांचं मरणापूर्वीचं ऐतिहासिक भाषण याच चौकात झालं होतं, असं तिथल्याच एका वयोवृद्धानं सांगितलं. चौकात सर्वत्र केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान उभे होते. त्यांच्या चिलखती गाड्या जवळच थांबलेल्या. तिथं सहज विचारताना एक मराठी जवान आहे असं समजलं. त्याचं नाव संतोष मुसमाडे. तो नगर जिल्ह्यातला. आम्ही भेटल्यावर त्याला साहजिक आनंद झाला. त्याच्या म्हणण्यानुसार दहशतवादी हल्ला कुठंही होऊ शकतो. दगडफेक तर नेहमीचीच आहे. आम्हांला ती सहन करावी लागते. चँपियन्स ट्रॉफी पाकिस्ताननं जिंकल्यावर याच चौकात पोरांनी फटाकड्या उडवून जल्लोष केला. डोक्यात तिडीक उठली. गोळ्या घालून सर्वांना मारून टाकावं असं वाटलं. आम्ही तसं करू शकतो. पण राग आवरावा लागला. आम्हांला त्यातनं पुढं दंगल घडू द्यायची नव्हती. रात्रंदिवस ऊन्ह- वारा- पाऊस आम्हांला हातात शस्त्र घेऊन थांबावं लागतं. पण आम्ही सारे एकमेकांच्या सहकार्यानं जेवणखाण करतो, सुट्टी घेतो. आपल्या देशाचे जवान म्हणून आम्हांला अभिमान वाटतो. तिरंगा फडकताना पाहिला की, आम्ही सलाम करतो.
आपल्या सशस्त्र जवानांनाही असा संयम बाळगावा लागतो. याच चौकात श्रीनगरचा माजी उपमहापौर शुजात चासू आम्हांला भेटायला आला. अगदी तरुण, सुमारे पस्तीस वर्षाचा. तो म्हणतो की, अन्यायग्रस्त लोक दगडफेक करतात. पण पर्यटकांना कुणीच त्रास देत नाही. पण देशात अपप्रचार केला जातो. आमची बदनामी केली जाते. विशेषतः टी. व्ही. चॅनल्सवरूनच आमच्याविषयी चुकीच्या गोष्टी बाहेर पसरवल्या जातात. आम्हांला पर्यटक हवे आहेत. आमच्या जनतेचा विरोध पोलिस आणि जवानांनाच आहे. आमची शांतता यांची भंग केली. डाऊन टाऊन चौक हे श्रीनगरातील प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथंच दगडफेक होते. ही दगड असंतोषातून होते. ज्यांच्यावर अन्याय झालाय तेच असं काम करतात. इथं मराठी लोक कित्येक वर्षापासून राहून आपला व्यवसाय करतात. पिढ्यान्पिढ्या सोनारकाम करणारे कारागिर चौकात आहेत. त्यांच्यावर दहशतवादाचा काही परिणाम होत नाही. बिहारी लोक इथं येऊन मोलमजुरी करतात, जगतात, त्यांनाही काही त्रास होत नाही. आपण त्यांना केव्हाही भेटून विचारू शकता.
काश्मीरची अस्वस्थता काय आहे? कुणामुळं आणि कशामुळं आहे? याचा शोध सुरू तरी झाला एकदाचा. पण एक गोष्ट खरी की, तिथल्या नागरिकांना सुख-शांती हवी आहे. अर्थार्जनासाठी पर्यटक यायला हवे आहेत!
(क्रमशः)