| --------------------------- -श्रीराम ग. पचिंद्रे --------------- गोमंतभूमीत धुवॉंधार पाऊस सुरू झाला, धरणे आणि तलाव भरायला सुरुवात झाली आणि अशा पावसातच मराठी राजभाषेच्या आंदोलनाची आग अधिकच भडकू लागली. कोकणी ही गोव्याची राज्यभाषा आहे, तर मराठीला सहभाषेचे स्थान आहे. मराठी भाषेला कोकणीच्या बरोबरीने राज्यभाषा म्हणून स्थान मिळावे, ही तमाम गोमंतकीय मराठी भाषिकांची मागणी आहे. गोव्यातील सर्व हिंदू जनतेची बोली कोकणी आहे, तर लिहिण्याची भाषा मराठी आहे. कॅथलिक समाजाचे लोक जी कोकणी बोलतात ती पोर्तुगीज भाषेच्या प्रभावाखाली असलेली बोली आहे. ते रोमन लिपीत कोकणी लिहितात. सारस्वत, भंडारी, खारवी, वेळीप, मराठा इत्यादी जातीच्या मराठी आणि कोकणी भाषिकांचा देवनागरी लिपीचा आग्रह आहे. तो योग्य आहे, कारण कोकणी ही मराठीचीच बोली असल्याने ती देवनागरीतच लिहिली पाहिजे. पण, कोकणी भाषिकांचा एक गट असा आहे की, तो रोमी लिपीचा समर्थक आहे. एका बाजूला भारतीय भाषा सुरक्षा मंचने आपल्या आंदोलनांनी सरकारसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान त्वरित बंद करावे ही मागणी घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक सुभाष वेलिंगकर यांची फौज हा लढा देत आहे. त्यांच्या फौजेत कोकणी आणि मराठी दोघेही आहेत. पण भाभासुमं मराठी राज्यभाषेविषयी चकार शब्द काढत नाही म्हणून मराठी राज्यभाषेची मागणी करणारे कार्यकर्ते नाराज आहेत. दरम्यान, मराठी राजभाषा समितीने साखळी उपोषणाची सुरुवात केली आणि पणजीच्या आझाद मैदानावर झालेल्या लाक्षणिक उपोषणाने आंदोलनाची सांगता झाली. भाभासुमंच्या आंदोलनाला जे बळ आहे, ते मराठी राजभाषा समितीकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण मराठी राज्यभाषेच्या आंदोलनाला जोर चढावा अशा दोन घटना घडल्या. विष्णू सूर्या वाघ हे गोव्याच्या सांस्कृतिक जीवनातील चैतन्यदायी नाव. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कॅथलिकबहुल मतदारसंघातून निवडून आलेले विष्णू वाघ हे कला अकादमीचे अध्यक्ष आहेत आणि गोवा विधानसभेचे उपसभापती आहेत. असे असतानाही मराठी राज्यभाषेची मागणी आपल्या हातात घेऊन दत सरकारविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. आझाद मैदानावर झालेल्या राजभाषा समितीच्या सभेत त्यांनी, ""मराठी ही गोव्याची नैसर्गिक भाषा आहे. मराठीला जे सांस्कृतिक अधिष्ठान आहे, ते कोकणीला नाही. मराठी ही गोव्याची राज्यभाषा झालीच पाहिजे. आमचा हा लढा विजय प्रप्त होईपर्यंत लढवू. आमच्या मार्गात जे कोणी आडवे येतील, त्यांना तुडवून आम्ही पुढे जाऊ'' अशी डरकाळी फोडली. गोव्यात अनेक वॉट्सप समूह आहेत, त्यावरही राज्यभाषा मराठीची सदैव चर्चा सुरू असते. त्यापैकी "मराठी असे आमुची मायबोली' हा एक महत्त्वाचा समूह मराठी राज्यभाषा झालीच पाहिजे या मागणीने प्रेरित होऊनच सुरू झालेला आहे. या समूहाच्या सदस्यांनी नुकतीच विष्णू वाघ यांची भेट घेऊन मराठी राज्यभाषा आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्याची मागणी केली. ही विनंती वाघ यांनी स्वीकारली. यासाठी खास बैठक बोलावून ""येत्या विधानसभा अधिवेशनात मराठीला राज्यभाषेचा दर्जा देणारे विधेयक न स्वीकारल्यास राझ्यभर तीव्र आंदोलन छेडणार,'' असा वज्रनिर्धार केला. हा लढा दै. "गोमन्तक'ने स्थापनेपासूनच चालवलेला आहे. विष्णू वाघ यांनी नव्याने सुरू केलेल्या "घणाघात' या सदरात मराठी राज्यभाषेचीच मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. आतापर्यंत समर्थ नेतृत्वाअभावी रेंगाळत चालणारे हा लढा आता खऱ्या अर्थाने पेटलेला आहे आणि तो मराठीला राज्यभाषेचे स्थान मिळवून देईल असा विश्वास मराठी भाषिकांच्या अंतःकरणात जागत आहे, हे खरे! | |||
Friday, 15 July 2016
मराठीचा लढा निर्णायक वळणावर!
Subscribe to:
Posts (Atom)