Tuesday, 6 February 2018

शिर उंच उंच राहो हिमवंत पर्वताचे...

श्री

काश्मीरची साद- 5
श्रीराम ग. पचिंद्रे
शिर उंच उंच राहो हिमवंत पर्वताचे...
आतापर्यंत नागरिक, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन महामंडळाचे अधिकारी, राजकीय नेते, पोेलिस अधिकारी यांच्याशी चर्चा झाली. आम्हांला उत्सुकता होती ती मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटण्याची. एकच दिवस आधी भेटीचा दिवस निश्‍चित झाला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी एका मशिदीजवळ जमलेल्या मुस्लिम समुदायानं तिथं आलेल्या एका तरुण पोलिस उपअधीक्षकाला मारहाण करून ठार मारलं. तोही मुस्लिमच. वातावरण तापलेलं. रमजानच्या महिन्यातच हे घडल्यानं श्रीनगरमध्ये सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीसुद्धा ह्या हत्येमुळं अस्वस्थ झाल्या होत्या.
तो त्यांच्या सुरक्षेसाठी गेला होता. मैं अपना आदमी हूँ असं तो मारहाण करणार्‍यांना सांगत होता. आपले लोक आहेत ह्या भावनेनं तो एकटाच गेला होता. फौजफाटा सोबत नव्हता. ऐसे मुबारक महिने में ये बुरा हुआ, त्या म्हणाल्या. 
पण काश्मीरमध्ये सध्या तरुण पिढीची जी विधायकतेच्या दिशेनं वाटचाल चालू आहे, तिकडे मेहबूबा यांनी लक्ष वेधलं. काश्मीरमध्ये जे वाईट घडतं, तिकडेच सारा भारत पाहतो, पण चांगल्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. लोकांना जगायचंय, जिवंत रहायचंय. वातावरण खराब असूनही शिक्षण आणि खेळामध्ये काश्मिरी मुलं-मुली आघाडीवर आहेत. लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण गुड न्यूज इज नो न्यूज अशी वृत्तवाहिन्यांची लख्ख भूमिका असल्यामुळं असलं काही वाहिन्या दाखवत नाहीत. दगडफेकीच्या घटना चोवीस तास दाखवल्या जातात. उनको तो टीआरपी बढाना होतात है. दगड फेकणारे तरुण स्वतःला टीव्हीवर पाहतात, तेव्हा त्यांना आपण काहीतरी मोठं काम केलंय, हम हीरो बन गये, असं वाटतं. मग त्याहून भयंकर कृत्य करायला ते प्रवृत्त होतात, काश्मीरमध्ये दंगल घडवणं हा काही लोकांचा उद्योग झालाय, मसला प्रायोरिटी नहीं बनता, अपना फायदा प्रायोरिटी बनता है...मेहबूबांच्या बोलण्यात खंत जाणवत होती. काश्मिरला दररोज सुमारे बारा हजार पर्यटक यायचे, ती संख्या आता निम्म्याहून कमी आली आहे.
काश्मीरमधील धार्मिक सलोख्याबद्दल मेहबूबा म्हणतात, आमच्याजवळ अमरनाथजी है, माता वैष्णोदेवी है. आम्हां सर्वांनाच त्यांच्याविषयी श्रद्धा आहे. भारतभरातून भाविक येतात. आम्ही लोक इकडून अजमेर शरीफला जातो, निजामुद्दिनला जातो. पर्यटकांना वाचवताना एका शिकारावाल्याचा मृत्यू झाला होता, वैष्णोदेवी दुर्घटनेत भाविकांना सहकार्य केलं. यात्रेतही आम्ही सहकार्य करत असतो.  लेकिन टीव्ही चॅनेलवाले नफरत बढा रहे है. आम्ही शेती- बागायतीच्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे, श्रीनगर स्मार्ट सिटीमध्ये निवडलं गेलंय, याची दखल घेतली जात नाही.
पुन्हा अटल बिहारींचा उल्लेख आला. त्यांच्या काळात लोक भयमुक्त होते. त्यांनी चांगलं वातावरण निर्माण केलं होतं. काहीतरी चांगलं होतंय याची जाणीव लोकांना झाली होती. ते आणि मुफ्ती साहेब यांच्यात चांगला स्नेह होता. दोघं एकमेकांचं ऐकत होते. हा देशाचा प्रश्‍न आहे, याची जाणीव त्यांना होती.लेकिन अब हालात ऐसे मुश्किल है कि दहशतवाद्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली तरी देशद्रोही ठरवलं जातंय. आम्ही सभ्यतेला, कश्मिरीयतला महत्त्व देतो. वाजपेयींच्या काळात चांगली सुरुवात झाली. आजपर्यंत जे जे पंतप्रधान झाले, त्यांच्यासमोर काश्मीर हाच मोठा प्रश्‍न होता. प्रत्येकानं काही ना काही तरी काम केलेलं आहे. हा राजकीय प्रश्‍न आहे, तो चर्चेनेच सोडवला जाईल. आणि आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच असे आहेत की, जे काश्मीरचा प्रश्‍न सोडवू शकतात. हा प्रश्‍न सोडवला, तर नोबेल ते पुरस्काराचे मानकरी ठरतील, असाही मेहबूबा यांचा विश्‍वास आहे.
भारताची पुण्यभूमी, विजयी समरांगण असलेल्या कारगिलला जायला दुपारी निघालो. हजरतबल, गंधरबल अशी गावं करत करत आम्ही पुढं चाललो. वाटेत काही ठिकाणी पोलिसांची गर्दी दिसत होती. तसं त्या भागात सारखं काहीतरी घडत असतं. सगळाच भाग संवेदनाशील म्हणावा असा. मेहबूबा यांनी आम्हांला सोनमर्गपर्यंत सशस्त्र पोलिसांचं संरक्षण दिलं होतं. तिथून पुढं भारतीय सैन्यदलाचा खडा पहारा जागोजागी होता, स्थानिक पोलिसांची आवश्यकता नव्हती. जाताना आमच्याबरोबरच इंडस नदी खळाळत उफाळत वाहात होती. तिचं शुभ्र फेसाळतं पाणी पाहून एक वेगळाच उत्साह वाटत होता. डोंगराळ वाटेनं, अवघड घाटातून जाताना इंडस नदीच्या पाण्याचा हा प्रवाह सोबत करतो. त्याचा थंडगार स्पर्श न करताही, दुरूनही मला जाणवला.
गाड्या हळुहळू पुढे जाऊ लागल्या. चढण वाढत गेली, तसा वेग मंदावला. डाव्या बाजूला बर्फाळ कडा उजवीकडे दरी. जोझीला पासची अवघड वळणं लागली. बर्फाचे थर वितळून आतल्या भागातून पाणी बाहेर येत होतं. त्यामुळं रस्ते खचले होते, रस्त्याच्या कडा तुटल्या होत्या. खूप कुशल चालकच तिथून गाडी काढू शकतो. वरून खालच्याजोझीला पास संपला सोनमर्ग आलं. तिथं सैन्याची छावणी आहे; तसेच दुचाकी गाड्यांवरून कारगिल, लेह- लडाखला जाणारे अनेक साहसी पर्यटक तंबू मारून राहिलेले असतात. नंतर द्रास लागलं. अगदी लहान गाव. तिथं युद्ध सुरू झालं होतं. तिथं भूदलाचं विश्रामधाम आहे. तिथून उंच डोंगरांवर पहारा देत असलेले जवान दिसत होते. भारत- पाकिस्तानच्या सरहद्दीवर ऊन्ह, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, बारा महिने चोवीस तास कडाक्याच्या थंडीचा मारा सहन करत, डोळ्याला डोळा न लागू देता पहारा करत, शत्रूसैन्याच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या भारतीय सैन्याकडे पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो. हे खरे देशाचे नायक म्हणायचे... आपण पडद्यावरच्या खोट्या चित्रांना नायक समजतो!
कारगिलला पोहोचायला रात्र झाली. हे एक ऐसपैस शहर आहे. तिथल्या हॉटेल कारगिलमध्ये सर्व पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
सकाळी सुरू व्हॅलीकडे रवाना झालो. आम्ही जवळजवळ पाकिस्तानच्या सहहद्दीपर्यंत पोहोचलो होतो. पर्वताच्या पलीकडे पाकिस्तानची हद्द सुरू होते.
कारगिल शहराच्या बाहेर पडून सुरू खोर्‍याकडे निघालो. वाटेत खुंबूथांबू गाव लागलं, तिथं सैन्याची छावणी होती. जवळच काश्मीर विद्यापीठाची कारगिल शाखा होती. तिथून पुढं ब्यामखुंबू गावाजवळ वाटेवरच एका पाषाणावर गौतम बुद्धांची आकृती कोरलेली आहे. हे कोरीबकाम सातव्या शतकातलं आहे. त्या काळात चंबा राजाची राजवट होती. बुद्धांच्या कोरीव प्रतिमेच्या खाली घोड्यावरच्या स्वाराची प्रतिमा कोरलेली आहे, ती चंबा राजाची आहे असं मानतात. बौद्ध धम्म (महायान पंथ) इथून जगभर पसरला असं इथले रहिवासी मानतात. इथले हिंदु आणि मुस्लिम रहिवासीही बुद्धांविषयी आदर बाळगतात, असं त्यांनी सांगितलं. जगातल्या शुद्ध हवेच्या ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे. तिथल्या हवेत श्‍वास घेताना याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. हा सगळाच परिसर अत्यंत शुद्ध हवेनं भरलेला आहे. पर्यटकांच्या गाड्यांच्या धुरानं जे होत असेल, तेवढंच प्रदूषण; माझ्या मनात अपराधी भावना आली.
तिथून काही अंतरावर संकू हे गाव आहे. संकू ह्या गावापासून डाव्या बाजूने सहा किमी अंतरावर गेल्यावर करचेकर गाव लागतं. ह्या गावात एका प्रचंड शिळेवर मैेत्रेय गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती आठ मीटर उंच आहे. मस्तकाच्या दोन्ही बाजूला गंधर्वांच्या मूर्ती आहेत. म्हणून मैत्रेय गौतम बुद्ध असं म्हणतात. बुद्ध दागिन्यांनी सजलेले आहेत असं दाखवणारी ही मूर्ती आहे. ह्या भागात मूर्तीला चंबा म्हणतात. शनिवारचा दिवस होता. मुलं- मुली
शाळेतून परत येताना दिसत होती. त्यांचे निरागस चेहरी आम्हांला पाहून फुलत होते, सगळी मुलं आमच्याकडे बघून हात हलवत होती. मंगोल वंशाच्या लोकांचे असतात, तसे ह्या मुलांचे, एकूण इथल्या रहिवाशांचे चेहरे दिसतात.
कारगिल परिसरात तीन ठिकाणी बुद्धांच्या मूर्ती आहेत. त्यातल्या दोन आम्ही पाहिल्या. पाचव्या शतकात नमग्याल राजांची राजवट होती. नमग्याल राजानं बाल्टिस्तानमधील इस्लामी राजकन्येशी प्रेमविवाह केला. आपल्याबरोबर एक इस्लामी विद्वान घेऊन यायला परवानगी दिली, तरच लग्न करणार अशी तिनं अट घातली. तिच्या सौंदर्यावर लुब्ध झालेल्या राजानं ती अट मान्य केली. तिच्या बरोबर आलेल्या इस्लामी विद्वानानं इस्लाम धर्माचा प्रसार केला आणि इथं इस्लामीकरण झालं, असं रहिवासी सांगतात. काश्मिरी लोक सहज बोलतानाही भांडतात असं वाटतं, ते काश्मिरी भाषेचं वैशिष्ट्य आहे. ह्या भागात वीज निर्मिती केंद्र आहे. पण इथली वीज बाहेर जाते. बुद्धांची मूर्ती पाहून आम्ही परत संकू गावात येऊन पुन्हा सरळ पुढे गेलो. तिथून पुढं सुरूचं खोरं (व्हॅली) सुरू होतं. इथल्या नदीचं नावही सुरूच आहे. सुरू नदीचं पाणी इंडस नदीपेक्षा शुभ्र आहे. इथल्या हिमावर धूळ साचून रहात नाही. ते धवलशुभ्र हिम वितळूनच पाणी प्रवाहित होतं. ते पाणी अतिशय थंड असलं, तरी त्याच्या विलक्षण चवीसाठी पिऊन पहायलाच हवं. समोरच जंबुरा नावाचं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं बर्फाच्छादित शिखर दिसत होतं.
दुपारी कारगिल पर्यटन विभागाचे चेअरमन आमदार हाजी अनायत अली आणि त्यांचे सहकारी व पर्यटन व्यवसायातले इतर लोक भेटले. इथून जवळच सरहद्द असल्यानं विकासाला मर्यादा येते. वास्तविक कारगिल ही युद्धभूमी असली तरी एरवी इथं शांतता असते. आपलं पराकमी सैन्य सदैव जागरूक असतं. कारगिलच्या रहिवाशांना मराठा योद्ध्यांविषयी खूप आदर आहे, तो ते बोलून दाखवतात. शत्रूने घुसखोरी केल्याची पहिली बातमी कारगिलच्या बकरपालाने  दिली, त्यामुळं हा सगळा परिसर देशभक्तीनं भारलेला आहे. ङ्गशिर उंच उंच राहो, हिमवंत पर्वताचे...आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेफ ही इथल्या नागरिकांची तीव्र भावना आहे. आम्ही तिरंग्याचा एवढा आदर करतो की, आमच्या इस्लामिक महोत्सवातही तिरंगा फडकावला जातो, असं अनायत अली म्हणाले.सगळा पहाडी परिसर आहे. कारगिल ते गुरेझ हा मार्ग सुरक्षेच्या कारणावरून सध्या बंद आहे. तिथं पाहण्याजोगे जुने किल्ले आहेत. श्रीनगर ते कारगिल आणि कारगिल ते गुरेझ अंतर सारखंच आहे. हा खुला झाला तर एक दिवसाची चांगली सहल होऊ शकते. 11 हजार 300 फूट उंचीवर हा प्रदेश आहे. ह्या जिल्ह्यात नऊ नद्या आहेत. त्यातल्या काही पाकमधून येतात. पहाडी भागात अनेक तळी आहेत. शेती आणि पशुपालन हा इथल्या प्राचीन अर्थकारणाचे मूळ आहे. पण आता त्याचं फारसं योगदान राहिलेलं नाही. त्यांच्याजवळ आता पर्यटनाशिवाय काहीच नाही. फाळणीमुळं पूर्वीचा नैसर्गिक रस्ता बंद झाला. इकडे सात हजार मीटर उंचीवरची शिखरं आहेत, त्या तळछावणीपर्यंत वाहनं नेता येतात. श्रीनगर ते कारगिल हेलिकॉप्टर सेवासुद्धा आहे, पण ती असल्याचं फारसं कोणाला माहीत नाही, त्यामुळं प्रतिसाद नाही. इथला महिलांचा हॉकी संघ राष्ट्रीय पातळीवर तयार होत आहे. हे लोक स्वतःला लडाखचे रहिवासी म्हणून अभिमान बाळगणारे आहेत. त्यांची भाषाही वेगळी आहे. हिंदु- मुस्लिम सलोखा आहे. बाजारपेठेत एकच हिंदु व्यापारी आहे, पण तो स्वतःला असुरक्षित समजत नाही.
कुसुमाग्रजांची कविता आहे...
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळले
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते...
ह्या ओळींचा खरा अर्थ कारगिलला समजतो.
इथं प्रगती व्हावी, व्यापार व्हावा, सुखशांती नांदावी असं पाकिस्तानला वाटत नाही. पण पाकव्याप्त काश्मीरमधले लोकसुद्धा पाकवर नाराज आहेत. गिलगिट, बलुचिस्तान, लेह, लडाख, कारगिल हा सगळा मिळून एकच भाग आहे आणि तो भारताचा आहे, असं कारगिलचे रहिवासी मानतात.
तोलोलिंग या ठिकाणी कारगिल विजय स्मारक आहे. एक छान संग्रहालय सैन्यानं जतन केलेलं आहेण बोफोर्स तोफा, इतर अनेक प्रकारच्या तोफा, बंदुका,
शस्त्रास्त्रे, तोफगोळे, युद्ध जिंकल्यानंतर पाकिस्तानकडून जप्त केलेल्या वस्तू असं बरंच काही ह्या स्मारकात आहे. आत प्रवेश केल्यानंतर दुतर्फा तिरंगे लहरत असतात. त्यामधून आपण आत जातो. शेवटी बरोबर मधे एक उत्तुंग ध्वज लहरत असतो. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं ताठ व्हावी असं हे स्मारक आहे.
याच वाटेवर टायगर हिल आहे. हे शिखर दुरूनही छान दिसतं. युद्ध जिंकल्यावर आपल्या सैन्यानं टायगर हिलवर जाऊन तिरंगा फडकावला होता. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा ह्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला हवी, असं वाटतं!


   

No comments:

Post a Comment