Tuesday, 6 February 2018

काश्मीरची साद

श्री
काश्मीरची साद
-------------
श्रीराम ग. पचिंद्रे
--------------
काश्मिरला हवीय शांतता
---------------------
अगर फिरदौस बरोय जमीं अस्त
हमीं अस्त हमीं अस्त हमीं अस्त
(ह्या पृथ्वीवर स्वर्ग जर कुठं असेल, तर तो हाच आहे, हाच आहे, हाच आहे) असं काश्मीरचं वर्णन मुगल बादशहा जहांगीर यानं केलेलं आहे.
काश्मीर हा स्वर्ग आहेच. जहांगिराच्या काळात तर तो निश्‍चितच नंदनवन म्हणावा असा असेल. त्यावेळी पाकिस्तान नव्हता, अखंड भारत होता,
दहशतवादाची आग नव्हती, अशांतता नव्हती, लोक सुरक्षित होते. आणि आज?...आजही काश्मीर हा स्वर्ग आहे, पण...काश्मीरविषयीची सारी पुस्तकं
विचारात घेतली, तर त्यांची शीर्षकं काय आहे? चिनारच्या ज्वाळा, अस्वस्थ नंदनवन, शापित नंदनवन, धुमसते काश्मिर इत्यादी...बहुतेक सगळ्या पुस्तकांचा एकच सूर आहे, तो म्हणजे काश्मीर अस्वस्थ आहे, अशांत आहे, धुमसत आहे...मग असं का आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपापल्या परीनं सगळे विचारवंत करताना दिसतात. पण खरोखरच काश्मीर धुमसत आहे का? असुरक्षित आहे का? सरहद ही पुणेस्थित संस्था गेली अनेक वर्षं काश्मीर आणि महाराष्ट्र यांच्यात सेतू बांधायचं महत्कार्य करीत आहे. ज्यांच्या पालकांना दहशतवाद्यांनी मारलं, जी उघड्यावर पडली अशा काश्मीरमधील अनाथ मुलांना  संजय नहार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुण्यात आणलं, गेली चौदा वर्षं ते त्यांना शिक्षण देत आहेत. जाहिद भट हा तरुण तिथंच शिकून मोठा झाला, तो काश्मिरी भाषेइतकीच सफाईदार मराठी भाषा बोलतो. त्याचा संसार महाराष्ट्रातच बहरला. एका कुटुंबातील पंधरा माणसं दहशतवाद्यांनी एका रात्रीत गोळ्या घालून मारली. त्या हल्ल्यात पाच जण कसेबसे वाचले, पण गंभीर जखमी झाले. घरातल्या लहानगीनं आपल्या पाच वर्षाच्या भावाला मागच्या खिडकीतून बाहेर फेकलं. तो वाचला. हाच जोगिंदर नुकताच पुण्यात पदवीधर झाला. 2002 पासून संजय नहार महाराष्ट्रातल्या पत्रकारांना काश्मिरचा दौरा घडवत आहेत. नुकताच ज्येष्ठ पत्रकारांचा अभ्यासदौरा जम्मू- काश्मीर पर्यटन विकास महामंडळानं सरहद संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला होता, जाताना मला अनेक हितचिंतकांनी सांभाळून जायला अन् जपून राहायला सांगितलं. तिथं दररोज काही ना काही घडतंच, लोक बळी पडतात. जवान बळी पडतात. सगळं अनर्थावह घडतंय. त्यामुळं काश्मिरला जायचं तर जीव मुठीत घेऊन, अशीच सर्वसामान्यांची समजूत आहे. श्रीनगरच्या विमानतळावर उतरल्यापासून वास्तव्याच्या ठिकाणी जाईपर्यंत वाटेत दुतर्फा पॉप्लर, पाईन, सफरचंदाची झाडे लक्ष वेधून घेत होती. काश्मिरचा प्रख्यात असलेला वृक्ष म्हणजे चिनार. चिनार सगळीकडेच होता.
मधमधे डाळिंबाची, अक्रोडाचीही झाडं दिसत होती. चिनार हा मूळ काश्मिरी वृक्ष नव्हे. तो पर्शियन वृक्ष. मुगलपूर्व काळात तो काश्मिरात आला. असं म्हणतात की, बुद्ध धम्माचे अनुयायी काश्मिरात आले तेव्हा त्या भूमीत पिंपळ कुठंच आढळला नाही, म्हणून त्यांनी पिंपळाऐवजी साधनेसाठी चिनारच्या वृक्षाचा स्वीकार केला. काश्मीरचा प्राचीन इतिहास पाहिला, तर तिथं शैव पंथाचं आणि वैदिकांचंही वर्चस्व होतं. नंतर बौद्ध आले आणि नंतर मुस्लिम आले.
प्राचीन काळात इथं शैव तत्त्वज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. अभिनव गुप्त हा महान पंडित शैव पंथाचा होता. त्यानं अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे.
अभिनव गुप्त याचे वारस स्वामी लक्ष्मण जू रैना यांचा आश्रम श्रीनगरमध्ये आहे. संपूर्ण काश्मिरात आता पंडितांची संख्या फार तर तीन हजार असेल. 1999 नंतर बहुसंख्य राज्य सोडून गेले. दाल सरोवरात पहिली हाऊसबोट स्वामींनीच शंभर वर्षापूर्वी आणली. ते अंतर्ज्ञानी होते. चिारच्या झाडाखाली बसून ते शिष्यांना शैव तत्त्वज्ञान शिकवायचे. ईश्‍वर आश्रम ट्रस्टचा हा आश्रम आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्याआधी जेव्हा त्या काश्मिरला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी आश्रमाला भेट दिली होती. स्वामी लक्ष्मण जू यांनी चिनारच्या वृक्षाखाली बसवून त्यांना बसवून पांढरी शाल पांघरली होती. पांढरी शाल पांघरून तुझा अंतकाळ जवळ आला आहे, हे त्यांनी सूचित केलं होतं, असं स्वामींचे सध्याचे वारसदार, त्यांच्या भावाचे पुत्र एल. जी. रैना यांनी सांगितले. ही गोष्ट खरी की खोटी हे आता कसं ठरवायचं? पण रैना तसं म्हणाले खरे.पांढरी शाल हे मृत्यूचं प्रतीक असतं म्हणे.
आज काश्मिरात जी अस्वस्थता आहे, ती नेमकी कशाची आहे याचा शोध घेतला, तर असं लक्षात आलं की, ती अनेक प्रकारची, गुंतागुंतीची अस्वस्थता आहे.
तिथल्या प्रश्‍नाला अनेक कोन आहेत, बाजू आहेत. सैनिकांवर, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर दगड फेकणं हा काही तरुणांचा रोजगार झालेला आहे. विघटनवादी शक्ती नवतरुणांना आणि मुलांना दररोज संध्याकाळी साडेपाच ते सहा सैनिकांवर दगडफेक करण्यासाठी पैसे देतात; जर पैसे मिळाले नाहीत, तर हे तरुण दगडफेक करत नाहीत.
आम्ही गेलो ते रॉयल स्प्रिंग गोल्फ कोर्सच्या परिसरात. दाल सरोवराच्या समोरच ते आहे. तिथं एक उद्योजक भेटले. त्यांचं नाव अमित वांच्छू. ते काश्मिरी पंडित आहेत.त्यांचा औषध निर्मितीचा उद्योग आहे, शिवाय त्यांचा एक वाद्यवृंदही आहे. त्यांचं म्हणणं असं की, सैनिकांवर दगड फेकणं हा काश्मिरात एक व्यवसाय बनलाय. तिथं सतत अस्वस्थता ठेवणं हाच एक उद्योग निर्माण झालाय. एका घरात सर्व पक्षाचे लो क राहतात. आई पीडीपीची, बाप नॅशनल कान्फरन्सचा, भाऊ दहशतवादी विघटनवाद्यांच्या बाजूनं, स्वतः काँग्रेसकडून, काका राष्ट्रवादी काँग्रेसचा. जिकडून पैसा मिळेल, त्यांच्या बाजूनं रहायचं. आपापल्या सोयीनुसार कधी जय हिंदुस्थान तर कधी जय पाकिस्तान म्हणायचं. लोक सतत भयभीत राहिले पाहिजेत असं फुटीरतावाद्यांना वाटतं. पण काश्मीर खोर्‍यात उद्योग उभे रहायला पाहिजेत, रोजगार वाढला पाहिजे इकडे कुणाचंच लक्ष नाही. बाहेरच्या लोकांना इथं जमीन विकत घेता येत नाही, ही गोष्ट खरी, पण 99 वर्षाच्या भाडेपट्टीनं जागा मिळतात, सरकारनं त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे.
पहिल्यांदा दारिद्ˆय दूर झालं पाहिजे. मग बाकीच्या समस्या सुटतील.
पर्यटन संचालक महमूद शाह यांनी तिथं भेट दिली. ते असं म्हणतात की, अशांतता आहे, अस्वस्थता आहे हे खरे. पण जे आहे त्यापेक्षा जास्त बाहेर दाखवलं जातं. बाहेर म्हणजे, देशभर. ग़ोळीबार झाला, होत असतो सारखा, पण तो पुलवामा भागात. वाहिन्यांच्या बातम्यांतून पसरवलं जातं ते श्रीनगरात गोळीबार झाला, दहशतवादी हल्ला झाला असं. श्रीनगर ही राजधानी असल्यामुळं काश्मीरची बातमी आली की, श्रीनगरचं नाव येतं. पोलिस शहीद झाले, जवान शहीद झाले, ही गोष्ट खरी. पण पर्यटकांनी भ्यायचं काहीच कारण नाही. आजपर्यंत एकही पर्यटक दहशतवादी हल्ल्यात दगावलेला नाही किंवा जखमीही झालेला नाही.  काश्मिरात 22 जिल्हे आहेत, पण फक्त कुलगाम, पुलवामा आणि शुफियां ह्या तीन जिल्हयातच अशांतता आहे. आमचं अर्थकारण पर्यटनावर आधारलेलं आहे. पर्यटकांना त्रास देणं हे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे, हे सर्व काश्मिरींना माहीत आहे. इथं समस्या आहेत, पण त्याहून जास्त  ङ्ग खौफ फ  बाहेरच्या जगात पसरवला जातो. आम्हांला याच गोष्टीची चीड आहे. इथल्या प्रत्येकाला पाहुण्यांबद्दल जिव्हाळा असतो.
तिथून आम्ही प्रसिद्ध लाल चौकात आलो. शेर -ए- काश्मीर शेख अब्दुल्ला यांचं मरणापूर्वीचं ऐतिहासिक भाषण याच चौकात झालं होतं, असं तिथल्याच एका वयोवृद्धानं सांगितलं. चौकात सर्वत्र केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान उभे होते. त्यांच्या चिलखती गाड्या जवळच थांबलेल्या. तिथं सहज विचारताना एक मराठी जवान आहे असं समजलं. त्याचं नाव संतोष मुसमाडे. तो नगर जिल्ह्यातला. आम्ही भेटल्यावर त्याला साहजिक आनंद झाला. त्याच्या म्हणण्यानुसार दहशतवादी हल्ला कुठंही होऊ शकतो. दगडफेक तर नेहमीचीच आहे. आम्हांला ती सहन करावी लागते. चँपियन्स ट्रॉफी पाकिस्ताननं जिंकल्यावर याच चौकात पोरांनी फटाकड्या उडवून जल्लोष केला. डोक्यात तिडीक उठली. गोळ्या घालून सर्वांना मारून टाकावं असं वाटलं. आम्ही तसं करू शकतो. पण राग आवरावा लागला. आम्हांला त्यातनं पुढं दंगल घडू द्यायची नव्हती. रात्रंदिवस ऊन्ह- वारा- पाऊस आम्हांला हातात शस्त्र घेऊन थांबावं लागतं. पण आम्ही सारे एकमेकांच्या सहकार्यानं जेवणखाण करतो, सुट्टी घेतो. आपल्या देशाचे जवान म्हणून आम्हांला अभिमान वाटतो. तिरंगा फडकताना पाहिला की, आम्ही सलाम करतो.
आपल्या सशस्त्र जवानांनाही असा संयम बाळगावा लागतो. याच चौकात श्रीनगरचा माजी उपमहापौर शुजात चासू आम्हांला भेटायला आला. अगदी तरुण, सुमारे पस्तीस वर्षाचा. तो म्हणतो की, अन्यायग्रस्त लोक दगडफेक करतात. पण पर्यटकांना कुणीच त्रास देत नाही. पण देशात अपप्रचार केला जातो. आमची बदनामी केली जाते. विशेषतः टी. व्ही. चॅनल्सवरूनच आमच्याविषयी चुकीच्या गोष्टी बाहेर पसरवल्या जातात. आम्हांला पर्यटक हवे आहेत. आमच्या जनतेचा विरोध पोलिस आणि जवानांनाच आहे. आमची शांतता यांची भंग केली. डाऊन टाऊन चौक हे श्रीनगरातील प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथंच दगडफेक होते. ही दगड असंतोषातून होते. ज्यांच्यावर अन्याय झालाय तेच असं काम करतात. इथं मराठी लोक कित्येक वर्षापासून राहून आपला व्यवसाय करतात. पिढ्यान्पिढ्या सोनारकाम करणारे कारागिर चौकात आहेत. त्यांच्यावर दहशतवादाचा काही परिणाम होत नाही. बिहारी लोक इथं येऊन मोलमजुरी करतात, जगतात, त्यांनाही काही त्रास होत नाही. आपण त्यांना केव्हाही भेटून विचारू शकता.
काश्मीरची अस्वस्थता काय आहे? कुणामुळं आणि कशामुळं आहे? याचा शोध सुरू तरी झाला एकदाचा. पण एक गोष्ट खरी की, तिथल्या नागरिकांना सुख-शांती हवी आहे. अर्थार्जनासाठी पर्यटक यायला हवे आहेत!
(क्रमशः)


No comments:

Post a Comment